Home सामाजिक चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा द्या

चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा द्या

314

आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ऐतिहासिक वारसा व भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने आर्थिक पाठबळ देण्याची विनंती

जिल्हा नियोजन समितीचा ठरावही मंजूर

चंद्रपूर : चंद्रपूर शहराचा समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि भाविकांची वाढती श्रद्धा लक्षात घेता, शहरातील प्राचीन श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

.        आमदार मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात चंद्रपूरच्या ८०० वर्षांच्या वैभवशाली इतिहासाचा संदर्भ दिला आहे. गोंड राजवटीपासून भोसलेकालीन परंपरेपर्यंत या शहराने आपली सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख जपली आहे. माता महाकाली आणि श्री अंचलेश्वर यांच्यासह भगवान श्री विठ्ठल हे चंद्रपूरचे प्रमुख आराध्य दैवत असून, हे मंदिर अनेक दशकांपासून वारकरी संप्रदायाचे आणि भाविकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र राहिले आहे.

सांस्कृतिक परंपरेचे जतन
मंदिराच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना मुनगंटीवार म्हणाले की, या ठिकाणी वर्षभर कीर्तन, भजन आणि विविध धार्मिक उत्सवांचे आयोजन केले जाते. विशेषतः आषाढी व कार्तिकी एकादशीला निघणारी भव्य रथयात्रा हा शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. या उत्सवात हजारो भाविक आणि महिला मंडळे मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

सुविधांसाठी ‘ब’ वर्ग दर्जाची गरज
दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्याने उत्सव काळात स्वच्छता, पाणीपुरवठा आणि कायदा-सुव्यवस्थेवर ताण येतो. मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यास शासन स्तरावरून आवश्यक निधी आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध होईल, ज्यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील.

.       या मागणीचा पाठपुरावा करताना, आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीने (DPC) यापूर्वीच तसा ठराव पारित केला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊन चंद्रपूरच्या या भावनिक ठव्याला योग्य दर्जा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

error: Content is protected !!