लोकशिक्षण संस्थेचा अमृत महोत्सवी उपक्रम
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
वरोरा : लोकशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘असे वाचक घडलो आम्ही’ या उपक्रमांतर्गत संस्थेच्या परिसरात २१ व २२ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय वाचक संमेलन आणि ग्रंथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ग्रंथदिंडी आणि उद्घाटन
संमेलनाच्या पहिल्या दिवशी, २१ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता शहरातून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येईल. सायंकाळी ४ वाजता संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव उपस्थित राहणार आहेत. प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री या स्वागताध्यक्ष असतील.
भरगच्च सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम
२१ फेब्रुवारी सायंकाळी ५ वा.‘वाचन चळवळ’ उपक्रमांतर्गत भीमाबाई जोंधळे (नाशिक), विनोद शेंडगे (परभणी) आणि डॉ. पल्लवी बापट (नागपूर) यांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वा. प्रा. श्रीकांत पाटील ‘आवडलेल्या कथा कथाकारांच्या शब्दात’ हा विशेष कार्यक्रम सादर करतील. २२ फेब्रुवारी सकाळी ९:३० वा. ‘वाचकाने लिहिते होताना’ या सत्रात डॉ. माधुरी मानवटकर व नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी आपला लेखन प्रवास मांडतील. सकाळी १०:३० वा. ‘मैफल कवितांची’ या कार्यक्रमात इंद्रजीत भालेराव यांच्या कवितांची मेजवानी रसिकांना मिळेल.
प्रसिद्ध प्रकाशकांचा सहभाग
या संमेलनात विजय प्रकाशन, लाखे प्रकाशन आणि पिंपळापुरे प्रकाशनासह महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशकांची पुस्तक विक्री केंद्रे उपलब्ध राहणार आहेत. जास्तीत जास्त वाचक प्रेमींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांनी केले आहे.
. या पत्रकार परिषदेला संस्थेचे कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, ॲड. दुष्यंत देशपांडे, प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री, प्राचार्य राहुल राखे, मुख्याध्यापक संजय अंबुलकर व स्मिता धोपटे प्रामुख्याने उपस्थित होते.


