खा. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते २० विकासकामांचा शुभारंभ
जिल्हा वार्षिक योजना व पारधी विकास निधीतून कोट्यवधींच्या कामांना मंजुरी
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांवर भर
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढाकार घेतला असून, मंगळवार आज १७ फेब्रुवारी २०२६ रोजी वरोरा तालुक्यात भव्य विकास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात तालुक्यातील विविध गावांमधील एकूण २० मोठ्या विकासकामांचे भूमिपूजन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते एकाच दिवशी संपन्न होणार आहे. सकाळी ९ वाजता एकाजुर्ना येथून या दौऱ्याचा प्रारंभ झाला असून सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा ‘विकास सोहळा’ तालुक्यात सर्वत्र पोहोचणार आहे.
शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष
या दौऱ्यांतर्गत प्रामुख्याने ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे जाळे विणले जाणार आहे. एकाजुर्ना, चिनोरा, कोंढाळा, आष्टी, वडगाव, दिंदोडा, बोरी आणि पांढुर्णी या गावांमध्ये नवीन अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींचे भूमिपूजन केले जाणार आहे. तसेच, केम आणि उमरी नाईक येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार असून, यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय होऊन त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल.
रस्ते विकासासाठी कोट्यवधींचा निधी
रस्ते विकासाच्या दृष्टीने खासदार धानोरकर यांनी मोठ्या निधीची तरतूद केली आहे. जामणी-फत्तापूर रोड खडीकरण: ५० लक्ष रुपये, सोनेगाव-गुंजाळा रस्ता मजबुतीकरण: ४० लक्ष रुपये, मोखाळा ते आल्फर केम जोड रस्ता: ७५ लक्ष रुपये, चिनोरा (पारधी टोला): सिमेंट रस्ते, नाली व पुलाची कामे या प्रमुख कामांचा समावेश आहे. यासोबतच, वडकेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ३० लक्ष रुपये खर्चाच्या संरक्षण भिंतीचे कामही यावेळी सुरू केले जाईल.
विविध योजनांतून निधीची उपलब्धता
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना, पारधी विकास कार्यक्रम आणि तीर्थक्षेत्र विकास निधीतून सातत्याने पाठपुरावा करून हा कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला आहे. ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हा दौरा मैलाचा दगड ठरणार आहे. या सर्व भूमिपूजन सोहळ्यांना वरोरा तालुक्यातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


