चपराळा शिवारातील घटना
सरपंच व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे महिलांचे वाचले प्राण
भद्रावती : तालुक्यातील चपराळा येथे रानडुकराने केलेल्या भीषण हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. सरस्वताबाई नवले (६५) आणि सुनंदा नागपुरे (४५) अशी जखमी महिलांची नावे असून, त्यांच्यावर सध्या चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
. मिळालेल्या माहितीनुसार, चपराळा येथील रहिवासी असलेल्या या दोन्ही महिला चालबर्डी शेत शिवारातील नागपुरे यांच्या शेतात कापूस वेचणीसाठी जात होत्या. यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे महिलांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच असलेले सरपंच विलास लेडांगे, मारुती कोंडेकर, ज्ञानेश्वर सिडाम, हर्षल कुटेमाटे आणि कपिल झाडे यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत डुकराला पिटाळून लावले आणि महिलांची सुटका केली.
. दोन्ही महिलांच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तातडीने भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, जखमांचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि विचारपूस केली. या घटनेमुळे चपराळा आणि परिसर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


