Home सामाजिक वरोरा शहरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन

वरोरा शहरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन

308

अतिशय जड अंतःकरणाने नागरिकांकडून श्रद्धांजली

लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

 वरोरा : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. ज्या सर्वसामान्य नागरिकांना दादांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहता आले नाही, त्यांच्या भावनांचा आदर करत राज्यभरात अस्थिकलश दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत वरोरा येथे दादांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला असता, स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या नेत्याचे दर्शन घेतले.

भावूक वातावरणात आदरांजली
अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. वरोरा येथे अस्थिकलश दाखल होताच संपूर्ण वातावरण भावूक झाले होते. जनसामान्यांशी असलेली त्यांची नाळ आणि विकासकामांचा झंझावात यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याप्रती अढळ स्थान आहे. उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी दादांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या अस्थिकलश दर्शन सोहळ्याप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलास नेरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास टिपले यांनी दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.

.       यावेळी लक्ष्मणराव गमे, बाबा भागडे, आशिष ठाकरे, अनिल झोटिंग, राहुल देवडे, बंडू देऊळकर, सुभाष दांदडे, मंगला पिंपळशेंडे, रंजना पारशीवे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. वरोरा शहराने आपल्या या जननेत्याला अत्यंत सन्मानाने आणि भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप दिला.

error: Content is protected !!