Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे हनुमान वॉर्डातील नागरिक संतप्त

वरोरा नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे हनुमान वॉर्डातील नागरिक संतप्त

344

नालीच्या तुटलेल्या स्लॅबमुळे अपघातांचे सत्र

८ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास शिवसेना व मनसेचा ‘खळ्ळ-खट्याक’ इशारा

नवनिर्वाचित नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

वरोरा : शहरातील हनुमान वार्ड, यात्रा रोडवरील शनी मंदिर परिसरातील पिजदूरकर यांच्या घरासमोरील नालीचा स्लॅब मागील दोन ते अडीच वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने, आता शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली आहे. येत्या ८ दिवसांत दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास ‘स्टाईलने’ आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

दोन वर्षांपासून पाठपुरावा, तरीही प्रशासन ढिम्म
या समस्येबाबत माजी मुख्याधिकारी भोयर यांच्यापासून ते विद्यमान मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. २४ सप्टेंबर २०२५ पासून मुख्याधिकार्‍यांना वारंवार फोन आणि व्हॉट्सॲपद्वारे माहिती देऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

जीवितहानीची शक्यता : कोण घेणार जबाबदारी ?
तुटलेल्या स्लॅबमुळे सदर नाली अत्यंत धोकादायक झाली आहे. या उघड्या नालीत आतापर्यंत अनेकदा गायी, कुत्रे यांसारखी जनावरे पडली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, खेळता खेळता दोन लहान मुलेही या नालीत पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी, भविष्यात एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांना निवेदन देताना शिवसेना जिल्हा संघटक पंकज नाशिककर, अनिल झोटिंग, संदीप मेश्राम, मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आशिष पिजदूरकर.

नवनिर्वाचित नगराध्यक्षांना साकडे
शिवसेना आणि मनसेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना ठाकरे व मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांना २ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. जर पुढील ८ दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

.         निवेदन देताना शिवसेना जिल्हा संघटक पंकज नाशिककर, नगरसेवक अनिल झोटिंग, संदीप मेश्राम, मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आशिष पिजदूरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार वरोरा आणि पोलीस निरीक्षक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!