नवीन शौचालयांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी सभापतींची आक्रमक मागणी
मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना मनिष जेठानी यांचे निवेदन
वरोरा : वरोरा शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत, नगर परिषदेचे सार्वजनिक बांधकाम समिती सभापती मनिष मुरली जेठानी यांनी प्रशासनाला पत्र देऊन विविध चौकांतील शौचालयांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद वरोरा आणि उपविभागीय अधिकारी यांना २ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वतंत्र निवेदने सादर केली आहेत.
प्रमुख चौकांत नवीन शौचालयांची गरज
सभापती जेठानी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, शहरातील वर्दळीची ठिकाणे असलेल्या आनंदवन चौक आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम चौक येथे नागरिकांच्या सोयीसाठी नवीन शौचालय बांधणे अत्यंत आवश्यक आहे. या भागातील नागरिकांची आणि प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने या कामाला त्वरित मंजुरी देऊन बांधकाम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
![]()
जुन्या शौचालयांच्या दुरुस्तीकडे वेधले लक्ष
केवळ नवीन बांधकामच नव्हे, तर अस्तित्वात असलेल्या मात्र नादुरुस्त अवस्थेत असलेल्या शौचालयांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. गांधी चौक येथील पुरुष मुतारी आणि वीर सावरकर चौकातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळील नादुरुस्त शौचालयाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील.
उपविभागीय कार्यालयात महिलांची कुचंबणा : तातडीने मुत्रीघराची मागणी
दुसऱ्या निवेदनात जेठानी यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) यांचे लक्ष वेधले आहे. उपविभागीय कार्यालयात ग्रामीण आणि शहरी भागातून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या कामांसाठी येतात. मात्र, या कार्यालयाच्या आवारात शौचालय किंवा मुत्रीघराची सोय नसल्याने नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कार्यालयाच्या आवारात तात्काळ शौचालयाचे बांधकाम करावे, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
![]()
. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतींच्या या पाठपुराव्यामुळे वरोरा शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


