शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार धानाचे चुकारे
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांना पत्र
आ. मुनगंटीवार यांना अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांनी केले आश्वस्त
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चुकारा प्रश्नावर शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत योजनेंतर्गत धानाचे प्रलंबित चुकारे तातडीने मिळावेत, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांना पत्र लिहीले. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव अनिल डिगीकर यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. या मागणीची दखल घेत प्रधान सचिवांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात धानाच्या चुकाऱ्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
![]()
. धान खरेदी होऊनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप चुकारे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याची बाब आ. मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिली. त्याचवेळी प्रलंबित रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली. या मागणीला प्रधान सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
. यासंदर्भात भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष बंडू गौरकार यांनी आ. मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची तातडीने दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी ना. छगन भुजबळ यांना पत्र लिहीले. ‘चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात आधारभुत किमतीनुसार ५ डिसेंबर २०२५ पासून प्रत्यक्ष धान खरेदी सुरु झाली आहे. आजपर्यंत 2369 रुपये प्रती क्विंटल याप्रमाणे 474286.46 क्विटंल धानाची खरेदी करण्यात आलेली आहे. धान विक्रीची एकूण रक्कम 112,35,84,623.74 रुपये एवढी असून आजपर्यंत शेतकऱ्यांना त्यांनी विकलेल्या धानाचे चुकारे मिळालेले नाहीत,’ याकडे आ. मुनगंटीवार यांनी पत्रामधून लक्ष वेधले.
. सध्या रब्बी हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना खते व औषधांकरीता पैशांची गरज भासत आहे.शेतकरी आर्थिक संकटात असून विकलेल्या मालाचे पैसे त्यांना मिळत नाहीत, ही शोकांतीका आहे. त्यामुळे देय चुकाऱ्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत जमा करावी, अशी विनंती आ. मुनगंटीवार यांनी केली.
. या संदर्भात प्रधान सचिव अनिल डीगीकर यांनी शासन स्तरावर आवश्यक प्रक्रिया सुरू करून, संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात येईल.येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री केलेल्या धानाचे चुकारे मिळतील, असे आश्वासन आमदार मुनगंटीवार यांना दिले.
. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत, चुकारा वितरणाची प्रक्रिया पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रश्नांवर शासनासोबत सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असेही आ.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सातत्याने पाठपुरावा करणारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची संवेदनशील भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


