दोन लॅपटॉपसह मुद्देमाल हस्तगत ; आरोपी अटकेत
100 पेक्षा अधिक CCTV फुटेजची तपासणी
वरोरा पोलिसांची कामगिरी
वरोरा : तालुक्यातील मांढेळी येथील ‘लारा’ मोबाईल शॉपीमध्ये शटर तोडून झालेल्या धाडसी चोरीचा व रोरा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीचे लॅपटॉप आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
. पोलीस सूत्रानुसार दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी शंकर नागोराव क्षीरसागर (रा. माढेळी) यांच्या ‘लारा मोबाईल शॉप’चे शटर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास तोडले होते. चोरट्यांनी दुकानातील ३० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप आणि ८० हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा अप.क्र. ०६/२०२६ कलम ३३१ (४), ३०५ बी. एन. एस. दाखल करण्यात आला होता.
. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी वरोरा शहरातील विविध दुकाने आणि घरांचे तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे वरोरा शहरातील हर्षद राहुल पेटकर (रा. वरोरा) याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारासह ही चोरी केल्याची कबुली दिली.
. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेले दोन लॅपटॉप किंमत ३० हजार रुपये आणि गुन्ह्यात वा परलेली मोटारसायकल किंमत ५० हजार रुपये असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजिंक्य तांबडे, सपोनी शरद एस. भस्मे, पोलीस हवाल्दार दिलीप सुर, संदीप मुळे, विशाल राजुरकर, महेश गावतुरे आणि सौरभ कुलथे यांनी पार पाडली.


