यशवंतराव शिंदे विद्यालयात स्नेहसंमेलनाचा उत्साह
माजी विद्यार्थी तथा नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा गौरव
भद्रावती : भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चिचोर्डी (भद्रावती) येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी, “स्नेहसंमेलने ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून, त्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो व त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो,” असे प्रतिपादन केले.
. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी, संस्थेचे विश्वस्त डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ. एल. एस. लडके आणि प्राचार्य डॉ. सुधीर मोते उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
. याप्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा डॉ. विवेक शिंदे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना चटकी यांनी, “विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करावे, अभ्यासात सातत्य ठेवावे आणि नेहमी गुरुजनांचा आदर करावा,” असा मोलाचा सल्ला दिला.
. डॉ. विवेक शिंदे यांनी पुढे सांगितले की, “विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे आणि जीवनात शिस्तीला सर्वोच्च महत्त्व द्यावे.” यावेळी डॉ. जयंत वानखेडे, डॉ. एल. एस. लडके आणि डॉ. सुधीर मोते यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली, ज्यात एकल नृत्य, समूह नृत्य, लावणी, नाटिका आणि फॅशन शो अशा विविध कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर केला. एकल नृत्य, समूह नृत्य, लावणी, नाटिका, गीत गायन, फॅशन शो अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा दोडके, शर्विल हटवार, अथर्व चौधरी, कु. ईशीका दातारकर, मृणाली हजारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रणिता बोकडे, प्रा. डॉ प्रशांत पाठक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, किशोर ढोक, रमेश चव्हाण, चंद्रशेखर जुमडे, प्रवीण मत्ते, नरेश जांभूळकर, राकेश आवारी, हरिहर मोहरकर, किशोर चौधरी, प्रतीक नागपुरे, राहुल भगत, अशोक पिदूरकर, धनराज कडूकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.


