Home सामाजिक आनंदवनातील सेवाकार्य आणि कौशल्य विकास उपक्रम कौतुकास्पद : मुख्य सचिव राजेश अग्रवाल

आनंदवनातील सेवाकार्य आणि कौशल्य विकास उपक्रम कौतुकास्पद : मुख्य सचिव राजेश अग्रवाल

335

कुष्ठरुग्ण व दिव्यांग विद्यार्थ्यांशी साधला संवाद

संधीनिकेतनकेंद्राचे केले अनावरण

चंद्रपूर : थोर समाजसेवक पद्मश्री बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन येथील विविध सेवा प्रकल्पांना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी बुधवारी दि. २१ जानेवारी भेट दिली. “डॉ. विकास आमटे यांच्या नेतृत्वाखाली महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांची सेवा आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी सुरू असलेले कार्य अतिशय प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आनंदवनच्या कार्याचा गौरव केला.

दिव्यांग विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद
या भेटीदरम्यान मुख्य सचिवांच्या हस्ते ‘संधीनिकेतन दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी दिव्यांग आणि अंध विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची आस्थेने विचारपूस केली. ऋतिका या अंध विद्यार्थिनीशी गप्पा मारताना त्यांनी तिचे शिक्षण आणि आवडीनिवडी जाणून घेतल्या. तर, अक्षरा गारघाटे या विद्यार्थिनीने सादर केलेल्या ‘तु बुध्दी दे…तु तेज दे…’ या प्रार्थनेचे मुख्य सचिवांनी विशेष कौतुक केले.

विविध विभागांची पाहणी
राजेश अग्रवाल यांनी आनंदवनमधील ग्रंथालय, संगणक विभाग, शिवणकला, ॲनी स्मार्ट क्लास, इलेक्ट्रॉनिक विभाग आणि काष्ठशिल्प युनिटला भेट दिली. तसेच हॅन्डलूम विभाग, संगीत कला अकादमी आणि रुग्णालयाची पाहणी करून तेथील प्रशिक्षणार्थी व रुग्णांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे यांची भेट घेऊन चर्चा केली.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
या दौऱ्यात नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह महारोगी सेवा समितीच्या पल्लवी कौस्तुभ आमटे, विश्वस्त सुधाकर कडू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!