आमदार करण देवतळे यांच्या हस्ते उद्घाटन
महिला सक्षमीकरणासाठी संघटित होण्याचे मान्यवरांचे आवाहन
भद्रावती : तालुक्यातील घोडपेठ येथे भारतीय जनता पार्टी घोडपेठ–कोंढा मंडळाच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून ‘महिला सन्मान, हळदी-कुंकू व स्नेहसंवाद’ कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते. बुधवारी स्थानिक किसान भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्याने महिलांच्या उत्साही सहभागामुळे परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते.
. कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या वेदांती करण देवतळे उपस्थित होत्या. याप्रसांगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष शामसुंदर उरकुडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, विधानसभा संघटक किशोर बावणे, जिल्हा महामंत्री लक्ष्मी सागर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रक्षिता निरंजणे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिला पारखी आणि माजी सरपंच विमल विश्वनाथ निमकर यांची उपस्थिती होती.
. मकरसंक्रांतीच्या परंपरेनुसार उपस्थित महिलांना हळदी-कुंकू लावून व वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. महिलांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सहभाग वाढवण्यासाठी संघटनात्मक बळ वाढवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वक्त्यांनी केले.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामसुंदर उरकुडे यांनी केले, तर संचालन माजी सरपंच वैशाली उरकुडे यांनी सांभाळले. शेवटी रक्षिता निरंजणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घोडपेठ-कोंढा मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.


