Home सामाजिक लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा

353

अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचे आवाहन 

चंद्रपुरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

१७ व्या वर्षापासूनच नोंदणी सुविधेचा लाभ घेण्याचे प्रशासनाचे मार्गदर्शन

चंद्रपूर : “भारतीय स्वातंत्र्यापासून आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार हे लोकशाहीचे प्रमुख मूल्य आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भवितव्य असल्याने, त्यांच्यात ही मूल्ये बालपणापासूनच रुजणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले.

.       २५ जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २३ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘नियोजन भवन’ येथे राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ. व्यवहारे बोलत होते. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शुभम दांडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आणि तहसीलदार विजय पवार उपस्थित होते.

वर्षातून चार वेळा नोंदणीची संधी
निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी सांगितले की, लोकशाहीत मतदार हा केंद्रबिंदू असून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निवडणूक आयोग आणि पारदर्शकता
उपजिल्हा निवडणूक अधिकारी शुभम दांडेकर यांनी निवडणूक प्रक्रियेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. देशात मुक्त आणि पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान सभेत ‘मतदानाचा सार्वत्रिक अधिकार’ या विषयावर सर्वांचे एकमत झाले होते, याची आठवण करून देत त्यांनी तरुणांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले.

.       कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार विजय पवार यांनी केले. संचालन सपना पिंपळकर यांनी तर आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी शुभम दांडेकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने केंद्रस्तरीय, ब्लॉकस्तरीय निवडणूक अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ देण्यात आली.

मतदानाचा अधिकार हा सर्वात महत्वपुर्ण : उपविभागीय अधिकारी मेश्राम

25 जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे आज राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहे. ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असेल त्यांनी त्वरीत मतदार यादीत आपले नाव नोंदवावे. लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. मतदार नोंदणी आता ऑनलाईनसुध्दा करता येते. मतदानाचा अधिकार हा सर्वात महत्वाचा अधिकार आहे, असे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी सांगितले.

नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप : वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या नवीन मतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यात रविना नाले, मनाली राऊत, कोमल सातरे, भुमिका घाटोळे, नयन घाटोळे, आरुषी डोईजड यांचा समावेश होता.

उत्कृष्ट बीएलओ / पर्यवेक्षकांचा सत्कार : मतदान प्रक्रियेत उत्कृष्ट काम करणा-या बीएलओ / पर्यवेक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात निलेश चु-हे, विभा सहारे, बंटी बिरीया, सुरेश गौरकार, प्रकाश होळंबे, विजय खनके यांचा समावेश होता.

error: Content is protected !!