Home सामाजिक संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त मिरवणुकीने विसापूर दुमदुमले

संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त मिरवणुकीने विसापूर दुमदुमले

346

सकल कुणबी समाज बांधवांचे आयोजन

भजन मंडळ व उत्कृष्ट देखाव्याचे आकर्षण

बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील सकल कुणबी समाज बांधवांच्या वतीने जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार (दि. २१) जानेवारी रोजी भव्य मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मिरवणुकीत संत तुकाराम महाराज यांचा देखावा, मा जिजाऊ व बाल शिवरायांचे प्रतिबिंब दर्शविणारे झाकी, एका ट्रॅक्टरवर महाराजांची प्रतिमा व सोबतीला भजन मंडळाचा सहभाग. एका सजवलेल्या बंडीवर विठ्ठल रुक्मिणी आकर्षक उत्कृष्ट देखाव्याने जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीने विसापूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या मिरवणुकीने विसापूर दुमदुमून गेले.

.       विसापूर येथील पाणी टाकीजवळील धनोजे कुणबी समाज सभागृहात जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण व पुजाअर्चना करून मिरवणुकीला समाज बांधवांनी प्रारंभ केला. ही मिरवणूक इंदिरा नगर वार्ड, साईबाबा मंदिर परिसरातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन करण्यात आले.

.       तेथून मिरवणूक अशोक नगर वार्ड मार्गाने रेल्वे चौकातील आली.येथे समाज बांधवांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना मालार्पण करून वस्तीभागात मार्गस्थ झाली. सुरभी चौक, मनोरंजन चौक, दत्त मंदिर, मार्गाने आंबेडकर वार्ड मार्गे ग्रामपंचायत भवन समोर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले.त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मालार्पण करून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

.       यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत सहभागी समाज बांधवांची सेवा म्हणून ठिकठिकाणी जलपान व मसाला भात देण्याची व्यवस्था केली होती. या पालखी मिरवणूकीचे सारथ्य जय दुर्गा महिला भजन मंडळ, गुरुदेव सेवा भजन मंडळ, राधिका महिला भजन मंडळ, राधाकृष्ण महिला भजन मंडळ, पदावली भजन मंडळ व जय हनुमान महिला मंडळांनी केले.

error: Content is protected !!