हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन
२० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहीम
रेल्वे स्थानके, बस स्थानके व सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची नजर
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार, चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘ऑपरेशन शोध मोहीम-१४’ राबवण्यात येत आहे. २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम चालणार असून, याद्वारे बेपत्ता किंवा घरून निघून गेलेल्या मुले, मुली, युवक-युवती आणि वयोवृद्ध व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
जिल्हा पोलीस प्रशासनाने या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात, रेल्वे स्थानके, बस स्थानके, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल किंवा दुकानांमध्ये कोणी संशयास्पद रित्या काम करणारी मुले, भिक मागणारी किंवा कचरा गोळा करणारी मुले आढळल्यास, तसेच बेपत्ता इसमांबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावे.
माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक
हरविलेल्या व्यक्तींबाबत माहिती देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. नागरिक खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात. पोलीस व्हॉट्सअॅप क्रमांक ७८८७८९०१००, तातडीची मदत ११२ (डायल ११२)
. बेपत्ता व्यक्तींना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस दल सक्रिय झाले असून, नागरिकांनी दिलेल्या एका लहान माहितीमुळे एखाद्याचे कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकते, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे.


