Home सामाजिक रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त माजरी पोलिसांचा पुढाकार

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त माजरी पोलिसांचा पुढाकार

335

टोल नाक्यावर वाहनचालकांची नेत्र व आरोग्य तपासणी

१०० हून अधिक प्रवाशांनी घेतला शिबिराचा लाभ

रस्ता सुरक्षा जनजागृतीवर भर

माजरी : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून माजरी पोलीस स्टेशनच्या वतीने वणी-वरोरा रोडवरील टोल नाक्याजवळ मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी भव्य नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात वाहनचालक आणि प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
या शिबिरात सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल धस यांनी ५० हून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी केली. वाहन चालवताना दृष्टी सुस्पष्ट असणे अपघातांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे, याबाबत त्यांनी चालकांना मार्गदर्शन केले. तसेच, आरोग्य उपकेंद्र पाटाळा येथील डॉ. मयुरी अहिर व त्यांच्या पथकाने ४७ रुग्णांची रक्तदाब, रक्तातील साखर आणि इतर सामान्य आजारांची तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार व सल्ला दिला.

१०० रुग्णांनी घेतला लाभ
रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले. एकूण ९० ते १०० रुग्णांनी या संधीचा लाभ घेतला. “वाहनचालकांचे आरोग्य चांगले असल्यास प्रवासातील धोके कमी होतात,” या उद्देशाने माजरी पोलिसांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर उपक्रमासाठी माजरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य विभागाच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!