ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीची नगराध्यक्षांना मागणी
दुकानदारांकडून होणारी वजन-मापातील फसवणूक रोखण्यासाठी पाऊल
भद्रावती : बाजारपेठेत वस्तू, धान्य किंवा भाजीपाला खरेदी करताना अनेकदा ग्राहकांना वजनात घट असल्याचे जाणवते, मात्र खात्री करण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने ग्राहकांची फसवणूक होते. ही बाब लक्षात घेऊन ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती’ च्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठेत ० ते ३० किलोग्रॅम वजनाचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा लावण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांना निवेदन देण्यात आले.
लवकरच ठराव घेऊन अंमलबजावणीचे आश्वासन
नगराध्यक्षांनी या मागणीची गंभीर दखल घेत, लवकरच पालिकेच्या सभेत ठराव घेऊन बाजारपेठेत वजन काटा लावण्याचे आश्वासन दिले. ग्राहकांच्या हितासाठी योग्य विषय मांडल्याबद्दल नगराध्यक्ष आणि उपमुख्याधिकारी यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या भद्रावती शाखेचे विशेष कौतुक केले.
अशी होईल ग्राहकांची मदत
वस्तू विकत घेतल्यानंतर वजन कमी मिळाल्याची शंका आल्यास ग्राहक नगरपरिषदेच्या अधिकृत वजन काट्यावर जाऊन खात्री करू शकतील. वजन कमी असल्याचे आढळल्यास, संबंधित दुकानदाराची तक्रार ‘ग्राहक पंचायत’ किंवा ‘वैद्य मापन शास्त्र’ विभागाकडे करता येईल. यामुळे दुकानदारांकडून होणारी फसवणूक कमी होऊन ग्राहकांना न्याय मिळेल, असा विश्वास भद्रावती शाखेचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर यांनी व्यक्त केला.
निवेदन देताना उपस्थित मान्यवर
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, सचिव वतन लोने, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, सहसचिव करुणा मोघे, सदस्य सोनल वावरे, विनोद ठमके, गुरुदेव बावणे आणि प्रतिक्षा बनकर उपस्थित होते.


