अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
भद्रावती : येथील लोकसेवा मंडळाद्वारे संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपाचे व लोकसेवा मंडळाचे आद्य संस्थापक अध्यक्ष स्व. निळकंठराव उपाख्य अण्णाजी गुंडावार यांच्या जयंती समारोहाचे उद्घाटन लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर दि. २० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता मूल-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून लोकमत मीडिया गृपचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य विजयबाबू दर्डा, राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे, लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतराव गुंडावार आणि माजी सचिव मनोहरराव पारधे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ऐतिहासिक वस्तू संग्राहक अमित गुंडावार यांनी संकलित केलेल्या ऐतिहासिक व शिवकालीन वस्तुंच्या प्रदर्शनीचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. ही प्रदर्शनी रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुली राहणार आहे.
. सायंकाळी ६.३० वाजता नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी आणि सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता प्रखर विचारवंत झी. टी. व्ही. फेम प्रशांत ठाकरे यांचा ‘हाती ज्यांच्या शून्य होते’ हा व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार, नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार, प्रोग्रेसीव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाटचे सचिव रमेश धारकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता भारतातील विविध राज्यांतील संस्कृतीवर आधारित नृत्याचा ‘नृत्याविष्कार’हा कार्यक्रम, हास्यजत्रा, मिसाबंदीवासी आणि नेत्रदान करणाऱ्या कुटुंबांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून भद्रावती पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश्वर पारधी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ आणि माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
. दि.२२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ‘चला अगस्ती होऊ या’ हा डाॅ. बाबा नंदनपवार यांचा व्याख्यानमालेचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक तथा भाजपाचे प्रांत संघटनमंत्री रवीजी भुसारी राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर राहणार आहेत. सायंकाळी ४ वाजता भारतातील विविध राज्यांतील संस्कृतीवर आधारित नृत्याचा कार्यक्रम ‘नृत्याविष्कार’ पार पडणार आहे. तसेच यावेळी कौशल्य विकास आधारित मार्गदर्शन कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण शिक्षण अधिकारी डॉ.वैभव बोनगिरवार मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भद्रावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश महाकाळकर, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दि.२३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता भारतीय संस्कृती दर्शन शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच दि.२४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता लोकमान्य ज्ञानपीठ प्रस्तुत देशभक्तीपर सामुहिक नृत्य व दि.२५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे.
. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, अमृत महोत्सवी वर्ष समन्वयक सचिन सरपटवार, प्राचार्य रुपचंद धारणे आणि प्राचार्य पूनम ठावरी यांनी केले आहे.


