सात खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड
२५ वर्षांनंतर महिला गटात राशी मांडवकरची निवड
लोकशिक्षण संस्था व स्पोर्ट्स फाउंडेशनचा डंका
वरोरा : येथील लोकशिक्षण संस्था आणि वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या (WSF) खेळाडूंनी व्हॉलीबॉल खेळात आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत थेट महाराष्ट्र राज्य संघात स्थान पटकावले आहे. विविध वयोगटातील सात खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने वरोरा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वरिष्ठ गटात शाश्वत आणि राशीची बाजी
वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पुरुष गटातून शाश्वत शंकर धारणकर तर महिला गटातून राशी दिनेशचंद्र मांडवकर यांची महाराष्ट्र संघात निवड झाली. विशेष म्हणजे, तब्बल २५ वर्षांनंतर वरोरा शहरातून वरिष्ठ महिला गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान राशी मांडवकरला मिळाला आहे.
शालेय स्तरावरही वरोरा अव्वल
१४ वर्षांखालील गटात लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूलची खेळाडू समृद्धी मनोज पिंगे हिची कडप्पा (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. शालेय राष्ट्रीय स्पर्धेत बरेली (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या स्पर्धेत लोकमान्य कन्या विद्यालयाची उर्वी रवींद्र दसरे हिने महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. १९ वर्षांखालील गटात गादरवारा (मध्य प्रदेश) येथे झालेल्या स्पर्धेसाठी लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाची सृष्टी मोहन चाटे, आयुषी संजय कुबडे आणि मुलांच्या गटात वेदांत दीपक गोरकार यांची निवड झाली.
सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव
या देदीप्यमान यशाबद्दल लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, ॲड. दुष्यंत देशपांडे आणि वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक सुनील बांगडे, प्राचार्य राहुल राखे, मुख्याध्यापक संजय आंबुलकर, स्मिता धोपटे, अनिल घुबडे, गणेश मुसळे, दुष्यत लांडगे, ईश्वर डाबेराव, देवानंद डुकरे, तालुका क्रीडा अधिकारी निखिल बोबडे आणि ज्येष्ठ खेळाडूंना दिले आहे. या यशामुळे वरोरा परिसरातून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


