वरोरा : स्थानिक लोकमान्य महाविद्यालय येथे विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSO) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री शास्त्री होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथपाल प्रा. लीना पुप्पलवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.
. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रत्येक शाखेतील दोन विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. लीना पुप्पलवार यांनी सावित्रीबाईंनी शिक्षणप्रसारासाठी सोसलेला संघर्ष आणि त्यांच्या खडतर जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात डॉ. जयश्री शास्त्री यांनी, “आजच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन समाजात उत्तम कार्य करावे आणि सामाजिक विकासात आपले योगदान द्यावे,” असे आवाहन केले.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सरिता जानवे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. हिमगौरी देशपांडे यांनी केले. शेवटी प्रा. वाटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


