मध्ये रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाहन चालकांना करावा लागतो अडचणीचा सामना
बल्लारपूर : तालुक्यात सर्वात मोठे विसापूर गाव आहे. हे गाव रेल्वे मार्गामुळे विभागले आहे. गावातील वाहन चालकांना ये-जा करण्यासाठी अंडरपास (भूमिगत) मार्ग रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे. मात्र, ऐन वळणावर भला मोठा खड्डा पडला आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
. विसापुरातील रेल्वे भूमिगत रेल्वे मार्गादरम्यान खड्डा अपघातप्रवण असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर मार्ग सुरळीत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातून तीन रेल्वे मार्ग गेले आहेत. चौथ्या रेल्वे मार्गाचे काम केले जात आहे. पुन्हा पाचवा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. १८ हजारांवर लोकसंख्या असलेल्या गावाची विभागणी रेल्वे मार्गामुळे झाली आहे. गावातील नागरिकांना व वाहनचालकांना आवागमन करण्यासाठी भूमिगत रेल्वे मार्ग तयार करण्यात आला. मात्र एका बाजूने रेल्वे अंडरपास (भूमिगत) रस्त्याची अवस्था अंत्यत दयनीय झाली आहे. ऐन वळणावर मोठा खड्डा पडला असून त्यातून लोखंडी सळाखी बाहेर पडल्या आहे. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.
. विसापूर येथील अंडरपास (भूमिगत) रेल्वे मार्गाची समस्या निकाली काढण्यासाठी मध्य रेल्वे विभाग व जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत मार्फत निवेदन सादर करून अवगत करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांना पाठवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र अद्याप रेल्वे मार्गादरम्यान अपघातप्रवण खड्डा व रेल्वे मार्गाची दुरावस्था दूर झाली नाही. परिणामी गावकऱ्यांचा असंतोष वाढला आहे. गावकऱ्यांनी भूमिगत रेल्वे मार्गाची दुरावस्था दूर झाल्याने रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावर रेल्वे प्रशासन काय मार्ग काढते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विसापूर गाव रेल्वे मार्गामुळे विभागले आहे. रेल्वे मार्गाची दुरावस्था मध्य रेल्वे विभाग व जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत मार्फत निवेदन सादर करून समस्या दूर करण्याची विनंती केली. आजघडीला जडवाहनाच्या आवागमन मुळे भूमिगत रेल्वे मार्ग दरम्यान वळणावर मोठा खड्डा पडला आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे मार्गाची दुरावस्था दूर करावी. त्याच प्रमाणे येथील गोंडवाना हाल्ट रेल्वे स्टेशन वर नागरिकांना ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची निर्मिती करावी, अशी ग्रामपंचायतीची आग्रही मागणी आहे. गावकऱ्यांच्या आंदोलनाला आमचे सहकार्य राहणार आहे. अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच ग्रामपंचायत, विसापूर.


