Home सामाजिक चंद्रपुरात रंगणार रामकथेचा सोहळा

चंद्रपुरात रंगणार रामकथेचा सोहळा

407

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले भूमिपूजन

चंद्रपूर : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या दिव्य चरित्राचा महिमा आणि भक्तीचा जागर चंद्रपूर नगरीत लवकरच अनुभवता येणार आहे. सुप्रसिद्ध कथाकार परमपूज्य राजन महाराज यांच्या अमृतमय वाणीतून साकार होणाऱ्या भव्य ‘रामकथा’ सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजित रामकथेच्या पवित्र स्थळाचा भूमिपूजन सोहळा आज राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विधिवत पार पडला.

.       १४ ते २२ जानेवारी दरम्यान, चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंड (श्री लखमापूर धाम) येथे या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत भाविकांना या पावन कथेचे श्रवण करता येणार आहे. भूमिपूजन सोहळ्यास सुधीर मुनगंटीवार यांनी सहपत्निक उपस्थित राहून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा-अर्चा केली.

.        यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “रामकथा ही केवळ एक कथा नसून ती भक्ती, धैर्य आणि सद्गुणांची दिव्य प्रेरणा आहे. या कथेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रभू श्रीरामांचे आदर्श पोहचावेत, हाच या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.”

.       चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या पावन सोहळ्याला उपस्थित राहून आध्यात्मिक आनंदाचा आणि रामकथेतील जीवनमूल्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण चंद्रपुरात आतापासूनच मंगलमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!