ॲड.दत्ता हजारे यांचे प्रतिपादन
बल्लारपुरात पार पडला राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सव
बल्लारपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांनी भजन व कीर्तनातून समाज प्रबोधन केले.समाजातील अनिष्ट रूढीवर प्रहार केला. समाजाची जडणघडण योग्य दिशेने व्हावी, म्हणून जागृती केली. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले. खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘ग्रामगीता’ ग्रंथाच्या माध्यमातून समाजोन्नतीचे प्रभावी दर्शन घडविले, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी ॲड. दत्ता हजारे यांनी रविवारी बल्लारपूर येथे सर्व संत स्मृती मानवता दिन व कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात केले.
. बल्लारपूर तालुका अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने स्थानिक विश्वकर्मा भवन, सार्वजनिक हनुमान मंदिर समोर, विवेकानंद वार्ड येथे शनिवार व रविवार ला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला. स्व.अवधूत नागोसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पार पडलेल्या कार्यकर्ता सत्कार समारंभात ॲड.दत्ता हजारे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई होत्या.प्रमुख अतिथी म्हणून ॲड.दत्ता हजारे, नवनिर्वाचित नगरसेवक देवेंद्र आर्य, डॉ. अनिल वाढई, ॲड.पवन मेश्राम, शिल्पा चुटे, मोना धानोरकर, मनोज बेले,ढोकेताई,गुरूकुंज मोझरी येथील कीर्तनकार आकाश ताविडे महाराज, चंद्रपूर जिल्हा गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव दादाजी नंदनवार, राजुरा तालुक्यातील सेवाधिकारी मोहनदास मेश्राम, अनुराधा हजारे यांची उपस्थिती होती.
. यावेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रामगीता, पुष्पगुच्छ, शाल प्रदान करून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी भास्कर डांगे, अरुणा डांगे, महेंद्र कोडापे,ओंकार कलसारे आदी पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण सत्कार केला. तत्पूर्वी येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्र प्रतिमेसह पालखी मिरवणूक भजन मंडळाच्या सहकार्याने व आकर्षक सजावट करून काढण्यात आली. दरम्यान ठिकठिकाणी पालखी मिरवणूकीचे गुरुदेव भक्तांनी औक्षण केले. भजन संमेलन दरम्यान तालुक्यातील २७ भजन मंडळांनी सहभाग घेत, राष्ट्रसंतांच्या विचारावर भजनाचे सादरीकरण करून गुरुदेव भक्तांचे प्रबोधन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी भास्कर डांगे यांनी करून गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याचा आढावा सादर केला.
. संचालन प्रा.डॉ. श्रावण बानासुरे यांनी केले. आभार गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला प्रमुख अरुणा डांगे यांनी मानले. राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवाच्या यशस्वी करण्यासाठी गंगाराम धोटे, श्रीराम वर्हाडे, दीपक मेश्राम, भैय्याजी त्रिंबके,संतोष देशकर,मनोहर राठोड, रामभाऊ पेटकर, गुणवंत सिडाम, विनोद कुडे, श्यामसुंदर निमसटकर, दत्ता अक्कलवार आदी गुरुदेव भक्तांचे सहकार्य मिळाले.


