शेतकरी हित आणि आर्थिक बळकटीकरणावर भर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्हाभरातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी वरोरा येथील ‘स्व. रा. ज. उपाख्य दादासाहेब देवतळे शेतकरी भवन’ येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बँकेची आर्थिक प्रगती आणि शेतकरी हिताच्या विविध योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
. या महत्त्वपूर्ण बैठकीला बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, संचालक जयंत टेमुर्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ, जिल्ह्यातील सर्व शाखांचे शाखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे बँकेच्या आर्थिक स्थितीला अधिक मजबूत करण्यासाठी ठेवींमध्ये वाढ करणे आणि गरजू शेतकरी व सभासदांना वेळेवर कर्जवाटप करण्यावर विशेष मंथन करण्यात आले. बँकेने शेतकरी आणि सभासदांना अधिक प्रभावी आणि तत्पर सेवा द्यावी, जेणेकरून सहकार चळवळीवरील जनसामान्यांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे निर्देश यावेळी देण्यात आले. प्रत्येक शाखेने आपली वार्षिक उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध आणि जबाबदारीने काम करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विश्वासार्ह बँकिंग सेवा पोहोचवणे हे बँकेचे मुख्य ध्येय असून, ही आढावा बैठक बँकेच्या भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.


