‘लेक वाचवा, लेक शिकवा‘ रांगोळी स्पर्धा
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नंदोरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करत असतानाच, ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या सामाजिक संदेशावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या कल्पकतेने सहभाग घेतला. कुंचल्याऐवजी रंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूणहत्या रोखणे, मुलींचे शिक्षण आणि महिला सक्षमीकरण यासारख्या गंभीर सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक रांगोळ्या साकारल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांमधून सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडला गेला, ज्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
![]()
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विजय सातपुते होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
. याप्रसंगी शिक्षक पंडित लोंढे, चंदा दातारकर, विजया बोंबले, माधुरी गिरटकर व अंगणवाडी शिक्षिका यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मदत झाली.


