अतिवृष्टी आणि सन्मान निधीची रक्कम कर्जखात्यात वळवली
आयडीबीआय बँकेचा मनमानी कारभार
महसूल मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
रवी खाडे
चंद्रपूर : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना, दुसरीकडे बँक प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी येथील शेतकरी बुधराज रामगोपाल केवट यांच्या हक्काची सरकारी मदतीची रक्कम वरोरा येथील आयडीबीआय बँकेने परस्पर पीक कर्ज खात्यात वळवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रकांत बावनकुळे यांनी कर्जवसुली स्थगितीचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही बँकेने या आदेशांना ‘केराची टोपली’ दाखवली आहे.
. भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे बुधराज केवट यांची ६ एकर शेत जमीन आहे. बुधराज केवट यांनी वरोरा येथील आयडीबीआय बँकेतून २०२१-२२ मध्ये १.७५ लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. सततची नापिकी आणि यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे ते कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. शासनाने अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शेतकऱ्यांना अतिवृष्टी चे हेक्टरी 8500 रुपये तर रब्बी हंगामांस प्रोत्साहन पर हेक्टरी 10 हजार रुपयाची मदत करण्यात आली व शेतकऱ्यांच्या डिबीटी खात्यात जमा करण्यात आले. मात्र, बँकेने ती रक्कम परस्पर कपात केली. यात अतिवृष्टी मदत: १८,४४५ रुपये व रब्बी प्रोत्साहन भत्ता २०,००० रुपये यासोबतच पीक विमा फसल योजनेचे २३,८८४ रुपये व पीएम किसान व नमो सन्मान निधी ४,००० रुपये जमा केले होते. ही संपूर्ण रक्कम आयडीबीआय या बँकेने शेतकऱ्याच्या पीक कर्ज खात्यात वळवली.
मंत्र्यांचे आदेश फक्त कागदावरच ? आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले होते की, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडून एक वर्षापर्यंत कोणतीही सक्तीची कर्ज वसुली केली जाणार नाही. ३० जूनपर्यंत थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबतही आश्वासने देण्यात आली होती. मात्र, वरोरा येथील आयडीबीआय बँकेच्या या कृतीमुळे सरकारचा बँकांवर वचक उरला नसल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वीही वरोरा तालुक्यातील चिकणी येथील एका मृत शेतकऱ्याला बँक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीची नोटीस बजावली होती. आता आयडीबीआय बँकेने थेट खात्यातील मदतीची रक्कमच वळवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “आमच्या तोंडचा घास बँक हिरावून घेत असेल, तर आम्ही जगायचे कसे ?” असा सवाल शेतकरी विचारत आहेत. आता या प्रकरणी महसूल मंत्री आणि जिल्हा प्रशासन संबंधित बँक प्रशासनावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
”निसर्गाने आधीच आमचे कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस हातातून गेला. सरकारने दिलेली मदत ही आमच्या पुढच्या पेरणीसाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी होती. पण आयडीबीआय बँकेने विचारणा न करता सर्व पैसे कापून घेतले. आता आम्ही खायचे काय आणि शेतात पेरायचे काय? बँकेने आमचा जगण्याचा आधारच हिरावला आहे.” बुधराज केवट, पीडित शेतकरी
“महसूल मंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले होते की कोणतीही बँक सक्तीची वसुली करणार नाही. मग आयडीबीआय बँकेने हा पराक्रम कोणाच्या आशीर्वादाने केला? हा थेट शासनाच्या आदेशाचा अवमान आहे. बँकांचे हे वागणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. पीक विमा आणि सन्मान निधीचे पैसे हे आमचे हक्काचे पैसे आहेत. बँका जर अशाच प्रकारे दरोडा टाकणार असतील, तर सरकारने केवळ घोषणाबाजी न करता अशा मुजोर बँकांवर कडक फौजदारी कारवाई करायला हवी.”जर बँकेने हे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात परत केले नाहीत, तर आम्ही बँकेसमोर तीव्र आंदोलन करू.”
किशोर डुकरे, शेतकरी नेता, वरोरा


