नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणी प्रक्रियेतील प्रभाव
चढउतारानंतरही कांग्रेसच्या उमेदवार निवडून आल्या
अनेकश्वर मेश्राम
बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मिनी भारत म्हणून ओळख असलेल्या व सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक निकालाची प्रक्रिया रविवारी पार पडली. ओबीसी महिला राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ८ महिलांची झुंज लक्षवेधी ठरली. मात्र खरा सामना रंगला कांग्रेसच्या उमेदवार अलका अनिल वाढई, भाजपाच्या उमेदवार रेणुका सुधाकर दुधे व शिवसेना उबाठाच्या चैताली दीपक मुलचंदानी यांच्यात. तब्बल तेरा फेऱ्यातील मतमोजणी प्रक्रियेतील चढउतार येथील नागरिकांनी अनुभवला. अखेर सांयकाळी ६ सुमारास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कांग्रेसच्या उमेदवार अलका अनिल वाढई यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी मात्र उत्कंठावर्धक निवडणूक निकालाने कांग्रेस व भाजपाच्या समर्थकांचा श्वास रोखणारे चित्र निर्माण झाले होते.
. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील (ओबीसी) महिला असे आरक्षण नगराध्यक्ष पदाचे होते. पहिल्या फेरी पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार अलका वाढई व भाजपाच्या उमेदवार रेणुका दुधे यांच्यातच निवडून येण्यासाठी चुरस निर्माण झाली होती. यामध्ये मात्र शिवसेना उबाठाच्या उमेदवार चैताली मुलचंदानी अखेर पर्यंत तिसरा क्रमांकावर राहण्यासाठी लढत असल्याचे दिसून आले.अलका वाढई यांनी पहिल्या फेरीत 3२४ मतांची आघाडी घेतली.दुसऱ्या फेरीत १3 मतांची झाली. तिसऱ्या फेरीत ५२ मतांवर आली. चवथ्या फेरीत ८3 मतांवर पोहचली. पाचव्या फेरीत 33 मतावर आघाडी स्थिरावली.
. मात्र सहाव्या फेरीत चित्र पालटले.भाजपाच्या उमेदवार रेणुका दुधे यांनी ७0 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर सातव्या फेरीत ४९, आठव्या फेरीत २६९ व नवव्या फेरीत १८3 मतांची आघाडी घेत निवडणूक निकालाची उत्कंठा चांगलीच वाढवली. यामुळे कांग्रेस व भाजपाच्या समर्थकांचा श्वास कोंडल्यागत अवस्था झाली होती.
. दहाव्या फेरीत पुन्हा कांग्रेसच्या उमेदवार अलका वाढई यांना भाजपाच्या उमेदवार रेणुका दुधे यांचेवर ६७ मतांची, तर अकराव्या फेरीत १२3 मतांची आघाडी मिळवून चुरस निर्माण केली.बाराव्या फेरीत रेणुका दुधे २८ मतांनी वरचढ ठरल्या. शेवटच्या तेराव्या फेरीत मात्र अलका वाढई यांनी ११९ मतांची निर्णायक आघाडी घेत बल्लारपूर नगरपालिकेच्या रणसंग्रामात अध्यक्ष पद प्राप्त केले. यामध्ये कांग्रेसच्या उमेदवार अलका वाढई यांना १४६0७ मते,भाजपाच्या उमेदवार रेणुका दुधे यांना १४3९२ मते, तर शिवसेना उबाठाच्या उमेदवार चैताली मुलचंदानी यांच्या पारड्यात १0६0२ मते पडली. अखेर अलका अनिल वाढई यांनी २१५ मतांच्या आघाडीने बल्लारपूरच्या प्रथम नागरिक ठरल्या.
नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांना मिळालेली मते
१) अलका अनिल वाढई – कांग्रेस – १४६0७ मते
२ ) रेणुका सुधाकर दुधे – भाजपा – १४3९२ मते
3 ) चैताली दीपक मुलचंदानी – शिवसेना उबाठा – १0६0२ मते
४ ) जोत्सना दीपक वाळके – वंचित ब.आ. – १९७3 मते
५ ) मंजुषा श्रीराम अय्यर – आप – १२६७ मते
६ ) वंदना पंचशील तामगाडगे – रिपब्लिकन पक्ष – ११२२ मते
७ ) पुजा अमर रहिकवार – बसपा – १0६२ मते
८ ) रोजिदा ताजुद्दिन शेख – राष्ट्रवादी काँग्रेस – ९२७ मते
९ ) नोटा – ४0८ मते


