3 शेतमजूर महिला ठार ; 14 जखमी
मंचेरियाल – हैदराबाद महामार्गावरील घटना
सावली तालुक्यातील शेतमजुरांवर काळाचा घाला
चंद्रपूर : सावली तालुक्यातील २३ शेतमजूर करीमनगर जिल्ह्यात शेतीच्या कामासाठी जात असतांना मंचेरियाल – हैदराबाद महामार्गावरील इंदाराम गावाजवळ एका उभ्या पिकअपला कोळसा वाहून नेणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन महिला शेतमजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर १४ शेतमजूर जखमी झाले. सदर अपघात सोमवार २२ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडला. मृतकांमध्ये मीना लाटेलवार (४५), नीलूबाई मानरे (६०) आणि इमलीबाई सय्यम (४५) या तीन रोजंदारी शेतमजूर महिलांचा समावेश आहे.
. सावली तालुक्यातील २३ शेतमजूर राशन घेऊन मुलांसह करीमनगर जिल्ह्यात कामासाठी निघाले होते. लघुशंकेसाठी जीप मंचेरियाल जिल्ह्यातील इंदाराम गावा जवळील रस्त्याच्या कडेला उभी करून थांबले असताना भरधाव ट्रकने धडक दिली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय आहे. महबुबाबाद जिल्ह्यातील ट्रक चालक बानोत रमेश यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
. तेलंगणातील शेतकरी महाराष्ट्रातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरांची कापूस काढणी, भातरोपे रोवणे आदी कामांसाठी वापर करतात. सदर मजूरवर्ग मुक्कामाने आणि कमी खर्चात काम करायला जात असल्याने तेलंगणा राज्यात या मजुरांची मोठी मागणी आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील महिला कामासाठी तेलंगणा राज्यात जात असतात. दरम्यान १४ जखमींवर मंचेरियाल जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


