४ हजारांची लाच घेताना दोघे रंगेहात जेरबंद !
दोन रजिस्ट्रींचे दस्तऐवज नोंदवून देण्यासाठी मागितली होती लाच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
चंद्रपूर : शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंद्रपूर येथे एक मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ चे अधिकारी मोहन चंद्रकांत शेटट्टीवार आणि त्यांच्या डेटा ऑपरेटरला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
तक्रारदार यांच्या पक्षकाराची भद्रावती तालुक्यात मालमत्ता होती. या मालमत्तेच्या दोन दस्तऐवजांची नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय, चंद्रपूर येथे कागदपत्रे सादर करण्यात आली होती. हे दस्तऐवज नोंदवून देण्याच्या मोबदल्यात दुय्यम निबंधक मोहन शेटट्टीवार यांनी प्रत्येक रजिस्ट्रीमागे २ हजार रुपये याप्रमाणे एकूण ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी थेट चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.
एसीबीने रचला सापळा
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, मंगळवार, १६ जून २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी करून कार्यालयात सापळा रचला. यावेळी आरोपी दुय्यम निबंधक मोहन शेटट्टीवार यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम मागून ती आपल्या डेटा ऑपरेटरमार्फत स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.
या पथकाने केली कारवाई
ही धडक कारवाई ला.प्र.वि. नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान आणि अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चंद्रपूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार, हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, विजेंद्र वाढई, अमोल सिडाम आणि राकेश जांभुळकर यांच्या संपूर्ण सापळा पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.


