Home चंद्रपुर जिल्हा विशेष छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री

छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री

11

भद्रावतीतील ‘समाधान पुर्ती’ सुपर बाजारवर कायदेशीर कारवाई !

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या तक्रारीनंतर वैध मापन शास्त्र विभागाचा दणका

२० रुपये अतिरिक्त घेतल्याने गुन्हा दाखल

भद्रावती : शहरातील नामांकित ‘समाधान पुर्ती सुपर बाजार’मध्ये ग्राहकाला छापील किंमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वैध मापन शास्त्र विभागाने धडक कारवाई करत सुपर बाजारवर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
शहरातील ग्राहक अशोक शेंडे यांनी २९ मे रोजी समाधान पुर्ती सुपर बाजारमधून किराणा सामानासोबत १ लीटरचे ‘ऑलीव्ह ॲक्टीव्ह ऑईल’ खरेदी केले होते. या ऑईल पॅकेटवर २५५ रुपये छापील किंमत (MRP) असताना, सुपर बाजारने त्यांच्याकडून २७५ रुपये आकारले. म्हणजेच तब्बल २० रुपये जादा घेऊन ग्राहकाची फसवणूक करण्यात आली.

ग्राहक पंचायतीकडे लिखित तक्रार
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अशोक शेंडे यांनी त्वरित ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’चे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर यांच्याशी संपर्क साधून लेखी तक्रार नोंदवली. ग्राहक पंचायतीने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ही तक्रार तातडीने वैध मापन शास्त्र विभाग, चंद्रपूर यांच्याकडे वर्ग केली.

वैध मापन शास्त्र विभागाची धडक कारवाई
मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक जितेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील वाडे यांनी ८ जून रोजी समाधान पुर्ती सुपर बाजारवर प्रत्यक्ष कारवाई केली. छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याप्रकरणी, वैध मापन शास्त्र अधिनियम २००९ आणि अन्न व नागरी पुरवठा (अत्यावश्यक वस्तू) नियम २०११ च्या नियम १८(२) नुसार सुपर बाजारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.        या यशस्वी कारवाईमुळे ग्राहक अशोक शेंडे यांना न्याय मिळाला असून, त्यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती आणि वैध मापन शास्त्र विभागाचे मनापासून आभार मानले आहेत.

error: Content is protected !!