आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद
मुख्यमंत्र्यानी दिले महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकाला कार्यवाहीचे निर्देश
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. मोरवा विमानतळाच्या विस्तार व आधुनिकीकरणासाठी आ. मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रस्तावाची तातडीने दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (MADC) व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना यावर आवश्यक व त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या सकारात्मक निर्णयामुळे मोरवा विमानतळाच्या विस्तार व आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे.
धावपट्टीची सद्यस्थिती आणि मर्यादा
सध्या चंद्रपूर विमानतळाची धावपट्टी सुमारे ९०० मीटर लांबीची असून छोट्या प्रवासी विमानांच्या उड्डाणासाठी ती अत्यंत अपुरी आहे. भविष्यात नियमित हवाई सेवा सुरू करण्यासाठी या धावपट्टीचा विस्तार करणे, डीजीसीए (DGCA) मानकांनुसार आधुनिक सुविधा उभारणे आणि अन्य पायाभूत विकासकामे करणे अत्यंत आवश्यक आहे. वाढत्या औद्योगिक आणि पर्यटनविषयक गरजांच्या तुलनेत येथील विमानतळाची सुविधा अपुरी असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मर्यादा येत असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
आ. मुनगंटीवार यांचा थेट पाठपुरावा
मोरवा विमानतळाच्या विस्तार, आधुनिकीकरण तसेच धावपट्टीच्या वाढीव कामांना गती मिळावी यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्ती, ऊर्जा उत्पादन, सिमेंट उद्योग, पोलाद उद्योग आणि वनसंपदेच्या दृष्टीने राज्यातील एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र म्हणून चंद्रपूरची ओळख निर्माण झाली आहे. हाच भौगोलिक आणि आर्थिक महत्त्वाचा धागा पकडत आ. मुनगंटीवार यांनी विमानतळाचा विस्तार जिल्ह्यासाठी किती आवश्यक आहे, हे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
जिल्ह्याच्या विकासाला लाभणार नवे बळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे चंद्रपूर विमानतळ विकासाचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे चंद्रपूरच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन विकासाला नवे बळ प्राप्त होणार असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच, चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मोरवा विमानतळ विस्ताराचा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न सातत्याने सुरू राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.


