सेवा केंद्र चालवविणाऱ्या ”पंकज ने प्रस्थापितांना चारली धूळ !
घुग्घुस येथील प्रभाग क्रमांक १० मधून प्रामाणिकपणाला विजय
सुरेश खडसे
घुग्घुस : राजकारणात पैसा आणि पॉवर असल्याशिवाय निवडणूक लढवता येत नाही, असे वारंवार म्हटले जाते. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीत एका तरुणाने हा समज खोटा ठरवला आहे. खिशात एक रुपया नसताना, केवळ लोकसेवेच्या जोरावर “एक छोटा सामाजिक कार्यकर्ता” ने प्रस्थापितांच्या गडाला सुरुंग लावत नगरसेवक पदी झेंडा रोवला आहे.
. पंकज बाळा धोटे उर्फ ”एक छोटा सामाजिक कार्यकर्ता”, एक ‘फकीर’ उमेदवार घुग्घुस येथील प्रभाग क्रमांक १० मधून विजयी झालेले पंकज बाळा धोटे , ज्यांना संपूर्ण शहर प्रेमाने ‘पंकज भाऊ ‘ म्हणून ओळखते, त्यांची ही कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे. पंकज भाऊ यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यांच्याकडे ना स्वतःचे बँक पासबुक आहे, ना डोक्यावर हक्काचे छत. अनेक कठीण प्रसंगात त्यांनी आपल्या आयुष्यातील कित्येक रात्री काढल्या आहेत. पण गरिबीने त्यांचा स्वाभिमान आणि जनसेवेची जिद्द कधीच मोडली नाही.
. लोक सेवेचा ध्यास आणि २४ तास तत्परता ‘पंकज भाऊ’ यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांनी कमावलेली माणसं. घुग्घुस शहरात कोणताही गरीब अडला की त्याला पहिली आठवण पंकज भाऊ ची येते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी लोक सेवेचे व्रत घेतले आहे. रात्री-अपरात्री कोणाचाही फोन आला तरी मदतीसाठी धावून जाणे, हे त्यांचे नित्याचे काम. लोकांची मदत करण्यात त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. याच निस्वार्थ सेवेची पावती आज जनतेने त्यांना दिली आहे.
. लोकवर्गणीतून लढली निवडणूक जेव्हा पंकज भाऊ यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्याकडे प्रचारासाठी पैसे नव्हते. पण त्यांच्या पाठीशी ‘जनता जनार्दन’ उभी राहिली. लोकांनी तसेच त्यांच्या मित्रांनी स्वतःहून लोकवर्गणी गोळा केली. कोणी बॅनर छापून दिले, तर कोणी त्यांच्यासाठी गाडी दिली. मित्रांनी प्रचाराची धुरा सांभाळली. समोर बलाढ्य उमेदवार आणि राजकीय ताकद असतानाही, पंकज भाऊ यांच्यासाठी सामान्य जनताच ‘स्टार प्रचारक’ बनली होती.
. प्रस्थापितांना बसला धक्का पंकज भाऊ यांच्या विरोधात कॉँग्रेस पक्षाचे अनुभवी नेते निखाडे रिंगणात होते. त्यांचे राजकीय वजनही मोठे होते. शिवाय हा मतदारसंघ आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे यांच्या बालेकिल्ल्यात येतो. अशा परिस्थितीत एका सामान्य कार्यकर्त्याचा विजय अशक्य वाटत होता. मात्र, निकालाने सर्वांनाच धक्का दिला. पैशांचा पाऊस पाडणाऱ्या राजकारणात जनतेने ‘पंकज भाऊ’ च्या प्रामाणिकपणाला कौल दिला.
. विजयानंतरचा संदेश पंकज भाऊ यांचा हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून तो लोकशाहीचा विजय मानला जात आहे. “निवडणूक ही धनाने नाही तर मनानं लढली जाते,” हेच या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नगरसेवक झाल्यानंतरही आपली लोकसेवा अशीच अविरत सुरू राहील, असा विश्वास पंकज भाऊ यांनी व्यक्त केला आहे.


