Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपुरात घरफोड्या करणारा आंतरराज्य सराईत गुन्हेगार जेरबंद

चंद्रपुरात घरफोड्या करणारा आंतरराज्य सराईत गुन्हेगार जेरबंद

449

रामनगर पोलिसांची मोठी कारवाई

२० लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात घरफोड्या करणाऱ्या एका सराईत आंतरराज्य गुन्हेगाराला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल १९ लाख ८४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी कार जप्त करण्यात आली आहे. मुस्तकीन मोहम्मद शौकीन चौधरी (वय ४३, रा. समर गार्डन कॉलनी, मेरठ – उत्तर प्रदेश) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

.      चंद्रपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी गुन्हे शोध पथकाला सक्रिय केले.

.       तपासादरम्यान शहरातील दोन घरफोडींच्या पद्धतीत कमालीचे साम्य आढळून आले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना एक संशयित आंतरराज्य गुन्हेगार चंद्रपुरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. तपासात मुस्तकीन शौकीन चौधरी हा मूळचा मेरठ (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असून तो सध्या चंद्रपुरात थांबलेला असल्याचे निष्पन्न झाले.

.      आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत शिताफीची होती. तो शहरात दार-खिडक्या बसवण्याचे किंवा दुरुस्तीचे काम करण्याच्या बहाण्याने फिरून बंद घरांची रेकी करीत असे. संधी मिळताच स्वतःच्या चारचाकी वाहनातून येऊन घरफोडी करून पसार होत असे. रामनगर पोलिसांनी आरोपीवर पाळत ठेवून चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी नेत असताना त्याला रंगेहात अटक केली.

.        या कारवाईत आरोपीकडून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, ही कामगिरी रामनगर पोलिसांच्या विशेष यशस्वी कारवाई म्हणून ओळखली जात आहे.

.       ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, हनुमान उगले, सहा. पो.नि. निलेश वाघमारे तसेच पोलीस अंमलदार लालू यादव, शरद कुडे, आनंद खरात, बाबा नैताम, रामप्रसाद नैताम, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, रविकुमार डेंगळे, संदीप कामडी, प्रफुल पुप्पलवार, सुरेश कोरवार, ब्ल्युटी साखरे व पंकज पोंदे यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!