Home चंद्रपुर जिल्हा विशेष जोरगेवार साहेब कुठे गेली ‘२०० युनिट मोफत वीज’

जोरगेवार साहेब कुठे गेली ‘२०० युनिट मोफत वीज’

454

आमदार किशोर जोरगेवारांना नागरिकांचा घेराव

चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत गाजलेले ‘२०० युनिट मोफत वीज’ हे आश्वासन आता आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठी अडचणीचे ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीला सहा वर्षे उलटूनही हे आश्वासन पूर्ण न झाल्याने चंद्रपूरकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, काल रात्री बंगाली कॅम्प परिसरात आमदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

.     बंगाली कॅम्प परिसरात एका कार्यक्रमानिमित्त आमदार किशोर जोरगेवार आले असता स्थानिक नागरिकांनी त्यांना घेराव घातला. यावेळी “२०० युनिट हाय हाय” आणि “किशोर जोरगेवार हाय हाय” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. ज्या २०० युनिट मोफत विजेच्या आश्वासनावर जोरगेवार यांनी निवडणूक जिंकली होती, तेच आश्वासन आता त्यांच्या विरोधाचे मुख्य कारण ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

.      २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘यंग चांदा ब्रिगेड’च्या माध्यमातून जोरगेवार यांनी मोठी लाट निर्माण केली होती. चंद्रपूर हे वीज निर्मितीचे केंद्र असतानाही नागरिकांना महागडी वीज का भरावी लागते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी २०० युनिट मोफत वीज देण्याचे वचन दिले होते. मात्र, सत्तेत सहभाग असूनही किंवा सरकारला पाठिंबा देऊनही हे आश्वासन पूर्ण न झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

.       मनपा निवडणुका तोंडावर असताना ‘२०० युनिटचा जुमला’ आमदारांना महागात पडणार का, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातही त्यांना काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. बंगाली कॅम्पमधील ताज्या घटनेतून नागरिक आता निवडणूक काळातील आश्वासनांचा हिशोब मागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

error: Content is protected !!