२० टक्के व्याज व प्रति दिन ५ हजार रुपये दंड
चंद्रपूर : खासगी सावकाराकडून एक लाखाचे कर्ज घेवून २० टक्के प्रमाणे व्याज व प्रति दिन ५ हजार रुपये दंड असे ४८ लाख ५३ हजार रूपये रोशन कुळे या शेतकऱ्याने सावकारांना परत दिले. ही रक्कम परत देतांना साडेतीन ते चार एकर शेती, मोटरसायकल, ट्रॅक्टर विक्री केली. साेबतच कंबोडीया देशात आठ लाखात मूत्रपिंड विकली. याप्रकरणी पाच खासगी सावकारांना ब्रम्हपुरी पोलीसांनी अटक केली आहे.
. जिल्ह्यात अवैध सावकारांच्या जाळ्यात शेतकरी पिसला जात आहे. नागभीड तालुक्यातील मेंढकी येथील शेतकरी राेशन कुळे याची कथा काहीची अशाच प्रकारची आहे. १६ डिसेंबर, २०२५ रोजी नागभिड तालुक्यातील शेतकरी रोशन कुळे यांनी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे तक्रार नोंदविली, त्यानुसार त्यांनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी म्हणजे चार वर्षापूर्वी ब्रम्हपुरी येथील सावकाराकडून १ लाख रूपये व्याजाने घेतले होते.
. त्यापैकी १५ हजार रूपये नगदी ३१ मार्च, २०२१ रोजी त्यांना परत दिले. परंतु उर्वरीत ८५ हजार रूपये वेळेवर जमावजमव न झाल्याने त्याने सावकाराला रकमेची परतफेड करण्यासाठी वाढीव मुदतीची मागणी केली. यावेळी सावकाराने २० टक्के प्रमाणे व्याज व प्रति दिन ५ हजार रु. दंड आकारणीची ताकीद देवून पैसे व्याजासह परत न केल्यास घरातील मौल्यवान वस्तू घेवून जाईल अशी धमकी दिली. त्यामुळे कुळे याने वेगवेगळ्या सावकाराकडुन व्याजाने पैसे घेवुन सावकारांना आतापावेतो ४८ लाख ५३ हजार रूपये दिले.
. सावकारांना पैसे देण्यासाठी फिर्यादी यांनी कंबोडिया देशात जावुन स्वतःची मूत्रपिंड विकले आहे. दरम्यान या विक्री प्रकरणाचा तपास सुरू आहे. मानवी अवयवांची तस्करी तर सुरू नाही ना या दिशेनेही पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे. दरम्यान एकूण सहा सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे व पाच खासगी सावकारांना ब्रम्हपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
. या पाच सावकारांमध्ये किशोर रामभाऊ बावनकुळे (४२) रा. कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे (४७), रा. पटेल नगर ब्रम्हपुरी, प्रदिप रामभाऊ बावणकुळे (३८) रा. देलनवाडी वार्ड, ब्रम्हपुरी, संजय विठोबा बल्लारपुरे (५०) रा. फवारा चौक, पटेलनगर, ब्रम्हपुरी, सत्यवान रामरतन बोरकर (५०) रा. टेकरी ता. सिंदेवाही, ह. मु. चांदगाव रोड, ब्रम्हपुरी या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर मनीष पुरुषोत्तम घाटबांधे (४२) रा. पटेलनगर ब्रम्हपूरी हा एक आरोपी फरार आहे.
. चंद्रपूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे जर कोणी अवैध सावकार आपल्या कडुन मुद्दलाचे पैश्या पोटी अव्वाचे सव्वा व्याज आकारुन आपली व कुटूंबियांची आर्थीक, शारिरीक व मानसिक छळवणुक करुन शोषण करीत असेल तर चंद्रपूर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाचे ११२ किंवा ७८८७८९०१०० यावर माहिती दयावी. आपले नांव गोपनिय ठेवण्यात येईल तसेच अवैध सावकारांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


