मार्गशीर्ष महिन्यातील स्नेह भोजन दरम्यान घटना
हनुमान मंदिरात भाविक गेले पूजापाठासाठी
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर गावाच्या हद्दीतील भिवकुंड परिसरातील बल्लारपूर – चंद्रपूर मार्गावरील हनुमान मंदिरात मार्गशीर्ष महिन्यातील स्नेह भोजन कार्यक्रमाला काही भाविक गेले होते. दरम्यान त्या ठिकाणी जेवन तयार केले जात होते.नेमक्या त्याचवेळी धुराच्या लोळाने मधमाशांच्या पोळातील मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. ही घटना सोमवार (दि. १५) रोजी सायंकाळी ४ वाजता घडली. मधमाशांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव किशोर वाढई रा.विसापूर असे आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील २५ आसपास भाविक मार्गशीर्ष महिन्यातील सोमवारी भिवकुंड परिसरातील हनुमान मंदिर परिसरात स्नेहभोजनासाठी गेले होते. त्या ठिकाणी स्वयंपाक करत होते.स्वयंपाकाच्या धुराने मधमाशांच्या पोळातील मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. यात तेथील भाविक सैरभैर धावत सुटले.यामध्ये किशोर वाढई व त्याचा चुलत भाऊ संजय वाढई मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. यातील किशोर वाढई याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांना जबर धक्का बसला.किशोर कुटुंबातील कर्ता होता. भाजीपाला व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या अकाली मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई,पत्नी, मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात विसापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मधमाशांच्या हल्ल्यातील त्याचा चुलत भाऊ गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.


