Home राजकीय बल्लारपूरच्या इतिहासात चौथ्यांदा मतदार निवडणार थेट नगराध्यक्ष !

बल्लारपूरच्या इतिहासात चौथ्यांदा मतदार निवडणार थेट नगराध्यक्ष !

690

थेट मतदारांतून पहिल्यांदा महिलेला मिळणार संधी

आठ जणींनी निवडणुकीत थोपटले दंड

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या २ डिसेंबरला होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.ओबीसी महिला राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी आठ महिलांनी एकमेकीविरुद्ध दंड थोपटले आहे. यावेळी नगराध्यक्ष पदाची निवड थेट मतदारांतून होत असल्याने पहिल्यांदाच महिलेला संधी मिळणार आहे. यापूर्वी बल्लारपूर नगरपालिकेच्या इतिहासात तिनदा नगराध्यक्ष थेट मतदारांतून निवडून आले असून, यावेळी चौथ्यांदा मतदारांना थेट नगराध्यक्ष निवड करावी लागणार आहे.

.       बल्लारपूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा थेट मतदारांतून नगराध्यक्ष निवड प्रक्रिया १ सप्टेंबर १९७८ रोजी पार पाडली होती. त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून एम. बाल बैरय्या यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या वेळी थेट मतदारांतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक १७ डिसेंबर २00१ मध्ये झाली.यावेळी नगराध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार म्हणून कनकमकुमार येलय्या यांची येथील मतदारांनी केली होती. तिसऱ्यांदा येथे नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट मतदारांतून २८ डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून हरिश शर्मा निवडून आले होते. आता २ डिसेंबरला होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूक देखील नगराध्यक्ष थेट मतदारांतून होत आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला राखीव जागेवर ८ महिलांनी एकमेकींना शह देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

.      बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक साठी नगराध्यक्ष पद मिळावे म्हणून भाजपाने माजी नगरसेवक रेणुका दुधे यांना संधी दिली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक अलका अनील वाढई यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. आंबेडकरी जनतेच्या मतांचा विचार करून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक वंदना तामगाडगे यांना उमेदवारी दिली आहे. त्याच प्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्योत्स्ना वाळके यांच्या उमेदवारी वर शिक्कामोर्तब केले आहे. बहुजन समाज पार्टीच्या पुजा अमर रहिकवार यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून रोजिदा ताजुद्दिन शेख नशीब आजमावत आहे.मंजुषा अलगर देखील निवडणुकीच्या रिंगणात हम किसीसे कम नही म्हणून लढत देत आहे. विशेष म्हणजे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनी आपली स्नुषा चैताली दीपक मुलचंदानी यांची उबाठा (शिवसेना) ची मशाल हातात घेऊन कांग्रेसला सोडचिठ्ठी देत बंडाचे निशान फडकावले आहे.

.      बल्लारपूर नगरपालिकेत सार्वत्रिक निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपदाचे कमळ फुलविण्यासाठी भाजपा आटोकाट प्रयत्न करत आहे. तर हाती मशाल घेऊन कांग्रेसला शह देण्याचा आटापिटा बंडखोर करत आहे. येथे कांग्रेस पक्षात बंडखोरीची लागून झाल्यामुळे सहकार क्षेत्रात कार्यरत हाताचे निशाण घेऊन मतदारांच्या पसंतीला उतरण्यासाठी प्रयत्न करत आहे. येथील नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक मुख्य म्हणजे कांग्रेसच्या अलका अनील वाढई, भाजपाच्या रेणुका सुधाकर दुधे व उबाठा (शिवसेना) च्या चैताली दीपक मुलचंदानी यांच्यात रंगतदार होण्याची शक्यता मतदारात चर्चा केली जात आहे. येथील 83 हजार 821 मतदार कोणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ घालतात,हे 3 डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालात स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!