महाबोधी जेष्ठ नागरिक संघाची मागणी
विविध क्षेत्रातील आस्थापनांना दिले निवेदन
बल्लारपूर : बल्लारपूर शहर टेकडी आणि वस्ती असे विभागले असून लोकसंख्या लाखावर आहे. यामुळे शहरात जेष्ठ नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवा, म्हणून महाबोधी जेष्ठ नागरिक संघ अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे. यासंदर्भात जनप्रतिनिधि सोबत शासन, प्रशासनाकडे निवेदन सादर करून आर्जव करत आहे. मात्र अद्याप जेष्ठांचा आवाज त्यांच्या पर्यंत पोहचला नाही. परिणामी महाबोधी जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
. बल्लारपूर नगरपालिकेच्या क्षेत्रात 32 वार्ड आहे. यातील केवळ सहा वार्ड वस्ती विभागात असून उर्वरित सर्व वार्ड टेकडी विभागात आहे. यामुळे शहरातील ७0 टक्के लोकसंख्या टेकडी भागात आहे. येथे मात्र मूलभूत समस्या निकाली काढण्याची नितांत गरज आहे. यासंदर्भात माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, बल्लारपूरचे मुख्याधिकारी, त्याचप्रमाणे शहरातील बॅंक व्यवस्थापक यांना निवेदन सादर करून जेष्ठांच्या समस्या अवगत केल्या आहेत. जेष्ठांना होणाऱ्या त्रास कमी करून दिलासा द्यावा. काही ठिकाणी सोई सुविधा निर्माण करावे, ही मागणी महाबोधी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नत्थुजी रामटेके, सचिव अशोक भावे, कोषाध्यक्ष पृथ्वीराज वाळके, सहसचिव किशोर नगराळे आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
जेष्ठांच्या प्रमुख मागण्या या आहेत वैशाली चौकात जेष्ठांना बसण्याची व्यवस्था करावी. टेकडी भागात एटीएम सुविधा चालू करावी. लोकसंख्या मोठी असल्याने पोलीस चौकी व पोस्टाचे उप कार्यालय सुरु करावे. उपचारासाठी उपरुग्णालय सुरू करावे. प्रत्येक बॅंक शाखेत जेष्ठ नागरिकांना स्वतंत्र खिडकी सुरू करून बसण्याची व्यवस्था करावी. नगरपालिकेच्या प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. चौकाचौकात मुत्रीघर तयार करावे, या व अन्य मागण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी शासन व प्रशासनाकडे लक्ष वेधले आहे.

