खरिप हंगाम गेला पुरात वाहून
शेतकऱ्यांचा पिकांची नासाडी झाल्याने आक्रोश
बल्लारपूर : तालुक्यात शेवटच्या टोकावर हडस्ती गाव आहे. इरई व वर्धा नदीलगत येथील शेतकऱ्यांची शेती आहे. यामुळे कधी निसर्गाचा फटका बसतो.तर कधी मानव निर्मीत संकटाचा सामना करावा लागतो. यावर्षी पावसाने चांगलेच थैमान घातले. परिणामी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पावसाने वाहून गेला.वर्धा व इरई नदीच्या पुराने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. तब्बल हडस्ती शेतशिवारात सातव्यांदा आलेल्या पुराने शेतशिवार जलमय झाले. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची नासाडी झाल्याने आक्रोश केला आहे.
. बल्लारपूर तालुक्यात कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर कृषी व्यवसाय अवलंबून आहे. अशातच पावसाने यंदा शेतकऱ्यांची दैनावस्था केली. वर्धा व इरई नदीच्या काठावरील शेतशिवार सातव्यांदा आलेल्या पुराने जलमय झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कापूस, तूर,मिरची, भाजीपाला व अन्य कडधान्य पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुराने हिरावला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही एका हडस्ती गावातील शेतकऱ्यांची व्यथा नाही. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे), चारवट, विसापूर, बल्लारपूर, बामणी (दुधोली), दहेली, कळमना, आमडी, पळसगाव, कोठारी आदी गावातील शेतकऱ्यांची देखील सारखी व्यथा आहे.
. शेतकऱ्यांनी कष्टाने खरीप हंगामासाठी मेहनत केली. आजघडीला बी-बियाणे, मजुरी, शेतीची मशागत केली. पेरणी केली.मात्र पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. शासनस्तरावरून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होतील. मायबाप सरकार मदतीची घोषणा करणार. मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबणार नाही. असेच चित्र आहे.
” शेतामध्ये रविवारी मिरची पिकाची लागवड केली. पण अचानक वर्धा व इरई नदीच्या पुराने शेतशिवार जलमय झाले. यामुळे अवसान गळाले.सगळी मेहनत वाया गेली. सततच्या पुराने शेतकऱ्यांची दैना झाली आहे. कापूस, सोयाबीन, भाजीपाला पिकांचे पुराने मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी च्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. आर्थिक नुकसान झाले आहे. ही भरपाई रब्बी हंगामात भरून निघणारी नाही. यामुळे आमच्या भागातील शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. ” सुरेश गौरकार, पिडीत शेतकरी हडस्ती.


