जि.प.अध्यक्षपदासह ८ पंचायत समिती मध्ये वर्चस्व
तिसऱ्यांदा येणार मिनीमंत्रालयात महिलाराज
अनेकेश्वर मेश्राम
बल्लारपूर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने अलीकडेच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले.त्यानुसार आगामी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी जि.प.अध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले. आता तिसऱ्यांदा चंद्रपूरच्या मिनी मंत्रालयात महिलाराज येणार असून १५ पंचायत समिती पैकी ८ मध्ये महिला सभापती होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात महिलांच कारभारी राणणार असल्याचे वास्तव निर्माण झाले आहे.
. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ गट व १५ पंचायत समितीच्या ११२ गणांची प्रारुप रचना करण्यात आली. मात्र अद्याप जिल्हा परिषद गटांची व पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत करण्यात आली नाही. परिणामी कोणत्या पंचायत समिती मधील गटात अनुसूचित जाती महिला गट राखीव होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, चंद्रपूर, कोरपना, जिवती,राजुरा,गोंडपिपरी,पोभूर्णा, मूल,सावली,ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर,सिंदेवाही,वरोरा, भद्रावती या पंचायत समिती आहे. यापैकी अनुसूचित जाती महिला एक,अनुसूचित जमाती महिला दोन, नागरिकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग महिला दोन व सर्वसाधारण महिला तीन असे एकूण ८ पंचायत समितीच्या सभापती पद आरक्षीत झाले आहे.
जिल्हा परिषदेवर तिसऱ्यांदा महिलाला संधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ७3 व ७४ वी घटना दुरुस्ती झाली. त्यानुसार राज्यात १९९५ पासून महिलांना आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. महिलांना आजघडीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ५0 टक्के आरक्षण मिळत आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा अध्यक्ष होण्याचा मान कोठारी – पळसगाव जि.प.गटातून विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली बाबासाहेब वासाडे यांना मिळाला.त्यांनी १९ फेब्रुवारी २०0५ ते २00७ पर्यंत जिल्हा परिषदेचा अडीच वर्षे कारभार सांभाळला. त्यानंतर संध्या गुरनुले यांनी राज केले. आता नव्याने आरक्षण सोडतीत जिल्हा परिषद अध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाल्याने तिसऱ्यांदा महिलेला संधी मिळाली आहे.
आता गट आणि गणांच्या आरक्षणाकडे लक्ष जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची प्रारुप प्रभाग रचनेला अंतीम केले आहे. त्यानुसार चंद्रपूर तालुक्यात ५, बल्लारपूर २, मूल 3, गोंडपिपरी 3, चिमूर ५, नागभीड ४, ब्रम्हपुरी ५, सिंदेवाही ४, जिवती २, सावली ४, पोभूर्णा २, कोरपना ४, राजुरा ४, भद्रावती ४ व वरोरा तालुक्यात ५ असे एकूण ५६ जिल्हा परिषद गटांची निर्मीती करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या तालुक्यात अनुसूचित जाती महिला साठी आरक्षण राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.


