अनेक गावात धूर फवारणीचा अभाव
डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला
सिंदेवाही : हवामानाच्या बदलांमुळे आणि अती पावसामुळे नाल्या, रस्त्यावरील खड्डे, डबके यामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून तालुक्यातील कोणत्याही ग्राम पंचायतीकडून धूर फवारणी केली जात नसल्याने डासांपासून होणाऱ्या आजारात लक्षणीय वाढ झालेली आहे.
. सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत पन्नास ग्राम पंचायती कार्यरत असून ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक जनावरे पाळतात. पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांमुळे अस्वच्छता पसरते. तसेच अनेक लहानमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असते. गावातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी बनविलेल्या नाल्यांमध्ये घाण साचली असल्याने डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. डासांच्या संख्येत वाढ झाली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच डासांमुळे संसर्गजन्य आजाराची शक्यता नाकारता येत नाही. सिंदेवाही तालुक्यातील अनेक ग्राम पंचायती कडे धूर फवारणी यंत्र आहे. मात्र तालुक्यातील अजून कोणत्याही ग्राम पंचायतीकडून धूर फवारणी केली जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे. संध्याकाळ होताच दरवाज्यावर डासांचा घोळका फिरत असतो.
. डासांपासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध प्रकारचे कॉइल वापरतात. मात्र काही काळासाठी डास पळाले असले तरी पुन्हा ते हल्ला करतात. त्यामुळे अनेक नागरिकांना रात्रभर जागे राहावे लागत असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधी जवळ सांगितले आहे. डासांच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील लहान मुलांच्या आजारात लक्षणीय वाढ झाली असल्याचे सरकारी तसेच खाजगी डॉक्टरांकडून बोलल्या जात आहे. गावागावात रस्त्यावर खड्डे पडले असल्याने त्या खड्ड्यात पाणी साचून त्यामध्ये डास तयार होतात. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील ग्राम पंचायतींनी याकडे विशेष लक्ष देऊन डासांपासून मुक्त करण्यासाठी विशिष्ट प्रकारची धूर फवारणी करावी. अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे.


