राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात श्रद्धांजली सभा
बल्लारपूर : येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन सदस्य व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या विचारांचे प्रचारक तथा धनगर समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ता मारोती गांवडे उर्फ गांवडे बाबू (८९) यांचे वृद्धापकाळाने शनिवार (दि. १६) आगस्ट ला सांयकाळी ७ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुन, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.
. मारोती गांवडे जिल्हा परिषद मध्ये कार्यरत होते.सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी अखेरपर्यंत गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याला वाहून घेतले. वयोवृद्ध झाल्यावर देखील त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या विचारांचा व कार्याचा प्रसार केला. त्यांचे शनिवारी निधन झाले. आज सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघाली. दरम्यान येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिराच्या प्रांगणात त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले.
. यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, विविध सामाजिक संस्था, गुरुदेव भक्तांनी व अनेकांनी अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. गुरुदेव सेवा मंडळाचे बंडोपंत बोढेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा प्रार्थना सभागृह प्रांगणात घेण्यात आली. यावेळी गुरुदेव भक्त व गणमान्य नागरिकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून आदरांजली अर्पण केली. त्यानंतर एका सजविण्यात आलेल्या वाहनातून भजन मंडळींच्या सहकार्याने अंत्ययात्रा निघाली. गुरुदेव भक्त मारोती गांवडे उर्फ गांवडे बाबू यांच्या अंत्यविधी विसापूर येथील स्मशानभूमीत झाला. यावेळी पंचक्रोशीतील गणमान्य नागरिकांची व गुरुदेव भक्तांची उपस्थिती होती.


