विसापूर गावावर शोककळा
आजोबांना कामात हातभार लावण्यासाठी निघाला होता,मात्र कपडे वाळत घालताना काळाने घातला घाला
एका होतकरू तरुणाचे स्वप्न अधुरे
बल्लारपूर : “हौसले बुलंद असोत तर परिस्थितीवर मात करता येते,” हे आपल्या कष्टाने सिद्ध करणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा नियतीने क्रूर अंत केला आहे. नुकताच दहावीचा निकाल लागला आणि ५६ टक्के गुण मिळवून यशाची पायरी चढलेल्या आयुष विशाल लाडे या विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एका कष्टाळू मुलाच्या मृत्यूने समाजमन सुन्न झाले आहे.
वडिलांचे निधन अन् आईची साथ सुटली; आजोबाच होते सर्वस्व
आयुषचे आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षाचे राहिले. लहानपणीच वडिलांच्या निधनामुळे त्याच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर आईने पुनर्विवाह केल्याने आयुष एकाकी पडला होता. अशा कठीण प्रसंगात विसापूर येथील त्याचे आजोबा निळकंठ वाघमारे यांनी त्याला पदराखाली घेतले. आजोबांच्या मायेच्या सावलीत राहून आयुषने आपले शिक्षण सुरू ठेवले होते. आजोबांची परिस्थिती बेताची असल्याने आयुष शिक्षणासोबतच सुट्ट्यांमध्ये मिळेल ते काम करून घराला आर्थिक हातभार लावत असे.
यशाचा आनंद ठरला क्षणभंगुर
नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात आयुषने ५६ टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते. या यशामुळे आयुष आणि त्याचे आजोबा खूप आनंदी होते. पुढे शिकून मोठे व्हायचे आणि आजोबांचे दुःख दूर करायचे, असे स्वप्न तो पाहत होता. रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे लवकर उठला. कामावर जाण्याची तयारी म्हणून त्याने आंघोळ केली आणि ओले अंतर्वस्त्र घराबाहेर बांधलेल्या लोखंडी तारेवर वाळत घालण्यासाठी गेला.
अशी घडली काळजाचा थरकाप उडवणारी घटना
ज्या तारेवर आयुष कपडे वाळत घालत होता, त्या तारेत अनवधानाने विजेचा प्रवाह उतरला होता. याची पुसटशीही कल्पना आयुषला नव्हती. त्याने ओले वस्त्र तारेला स्पर्श करताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. हा धक्का इतका तीव्र होता की, त्याला सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि जागीच त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
गावात पसरली शोककळा
आयुष हा अत्यंत मनमिळावू आणि कष्टाळू मुलगा म्हणून गावात ओळखला जात होता. स्वतःच्या शिक्षणासाठी कर्टरचे काम करणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीत दहावी पास होणाऱ्या या मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने विसापूर ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले आहे. एकीकडे यशाचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे त्याच्या निधनाची बातमी आल्याने वाघमारे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.


