पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश
अवैध धंदे आणि गुंडागर्दीवर त्वरित कारवाई करा
शहरातील अपघातांच्या सत्रावर अंकुश लावण्यासाठी जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंधाच्या सूचना
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाढत्या रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा कडक सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या. नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुश नोपानी यांनी त्यांची भेट घेतली असता, पालकमंत्र्यांनी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेत हे निर्देश दिले.
. या बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अवैध धंद्यांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’
पालकमंत्री डॉ. उईके यांनी स्पष्ट केले की, चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुंडागर्दी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. जे नागरिक किंवा घटक कायदा हातात घेतील किंवा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर पोलीस विभागाने त्वरित आणि कठोर कारवाई करावी. या कामात कोणतीही हयगय करू नये, असे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.
अपघातांच्या सत्रावर चिंता व्यक्त
गेल्या तीन-चार दिवसांत चंद्रपूर शहरात झालेल्या भीषण अपघातांमध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, याबद्दल पालकमंत्र्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. हे अपघात दुर्दैवी असून शहरातून होणारी जड वाहनांची अनिर्बंध वाहतूक याला कारणीभूत ठरत असेल, तर अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरून काम करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
. नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुश नोपानी यांनी या सूचनांची गांभीर्याने दखल घेत, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल तत्पर राहील, असे आश्वासन दिले.


