Home चंद्रपुर जिल्हा विशेष जिल्हा प्रमुख पद विकणे आहे : संपर्क राऊत

जिल्हा प्रमुख पद विकणे आहे : संपर्क राऊत

787

अज्ञाता विरुद्ध वरोरा पोलिसात तक्रार

वरोऱ्यात व्यंगात्मक बॅनरमुळे शिवसैनिक संतप्त

वरोरा : “जिल्हा प्रमुख पद विकणे आहे. संपर्क राऊत” अशा मजकुराचे फलक शहरातील आनंदवन चौक, रत्नमाला चौक आणि अन्य प्रमुख भागांमध्ये अज्ञात व्यक्तींनी लावल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वरोरा शहराच्या मध्यवर्ती चौकांत मध्यरात्री लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलकांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

.       या फलकांमध्ये आणखी लिहिले आहे की “मला नाही अबू, मी कशाला घाबरू” असा टोला देत पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर उपहासात्मक भाष्य करण्यात आले आहे. त्यात रेखाटलेल्या व्यंगचित्रात एका प्रमुख पदाधिकाऱ्याचे प्रतिकात्मक चित्र असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे बॅनर लावले गेले पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे आरोपींचा तपास अधिक गुंतागुंतीचा ठरणार आहे.

.       या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना (उबाठा गट) जिल्हास्तरीय नेतृत्वाने तातडीने बैठक घेऊन वरोरा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, जिल्हाप्रमुख संदीप गिरे, मनीष जेठानी, वैभव डहाणे, पंकज नाशिरकर, दत्ता बोरीकर, भास्कर ताजने, प्रमोद वाघ यांच्यासह शेकडो शिवसैनिक पोलीस ठाण्यात हजर होते.

.        प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक अजिक्य तांबळे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, मुख्य चौकात लावले गेलेले हे बॅनर कोणाच्या संमतीशिवाय आणि कोणत्या हेतूने लावले गेले, याचा तपास लावणे पोलीसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.

.        हा केवळ तांत्रिक बिघाड म्हणावा का, की हे दुर्लक्ष हेतुपुरस्सर आहे, असा सवाल आता उपस्थित होतोय. जेव्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीतच बिनधास्तपणे अस्वस्थ करणारी जाहिरात लावली जाते. तेव्हा पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहणे स्वाभाविक आहे.

.         मुख्य चौकात सीसीटीव्ही कार्यान्वित नसणे म्हणजे संभाव्य अपराध्यांना आमंत्रणच देणे नाही का? जर या गंभीर घटनेचा व्हिडीओ फुटेज नसेल, तर भविष्यात गंभीर घटना घडल्यास त्याचे पुरावे तरी कसे सापडणार वरोरा पोलिसांनी या प्रकाराची जबाबदारी घेत, संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने तपासून सुरळीत करावे जेणेकरून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे या प्रकारामुळे बोलल्या जात आहे.

सीसीटीव्ही बंद : प्रशासनाचे दुर्लक्ष                                                                                                                                                             वरोरा शहरातील सर्वात प्रमुख चौकांमध्ये मध्यरात्री कोणीतरी बिनधास्तपणे फलक लावतो. ते देखील थेट पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पण आश्चर्य म्हणजे या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे.

error: Content is protected !!