ट्रॅक्टर जप्त
चंद्रपूर : घरकुलधारकांना रेती मिळत नसल्याने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. मात्र खनिज चोरीत भाजपचेच नेते आघाडीवर असल्याचे चित्र आहे. भाजपचे तालुका महामंत्री खनिज चोरीत अडकल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हातील हिवरा गावाचे सरपंच आणि भाजपचे महामंत्री निलेश गिरमा पुलगमकार यांच्या मालकीचे ट्रॅक्टर महसूल विभागाने जप्त केले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा हे गाव राजुरा विधानसभा मतदारसंघात मोडत असून येथे खनिज चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
. जिल्ह्यातील विकासकामांना सध्या गती आली आहे. विकासकामांसाठी लागणाऱ्या खनिजाची चोरी दिवसरात्र सुरू आहे. गोंडपिपरी तालुक्यातील लिखितवाडा वाळू घाटातून नियमबाह्य वाळूचा उपसा सुरू असतानाही महसूल विभागाने अद्याप कुठलीच कारवाई केलेली नाही. या वाळू तस्करीत राजुराऱ्यातील भाजप नेत्याच्या नातेवाईकाचा समावेश असल्याची चर्चा आहे. अशातच भाजपचे तालुका महामंत्री निलेश पुलगमकार मुरूम चोरीत अडकले आहे. ते स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरने मुरूम चोरी करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. वेडगाव येथील तलाठी विकास चोपडे यांनी रविवारी घटनास्थळ गाठून मुरमांनी भरलेले ट्रॅक्टर जप्त केले.


