नागरिकांची मागणी
कोरपना : सध्या राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राजुरा येथे पथक कार्यरत आहे. या पथकाचे एक उपपथक गडचांदूर येथेही कार्यरत आहे. मात्र, कोरपना व जिवती हे दोन्ही तालुके मोठ्या भौगोलिक क्षेत्रफळावर पसरलेले असल्याने व येथील दुर्गम व आदिवासी भागात हत्तीरोगासारख्या आजाराचा धोका अधिक असल्यामुळे स्वतंत्र पथकाची आवश्यकता जाणवते आहे.
. राजुरा येथील मुख्य कार्यालयाचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे कोरपना व जिवती तालुक्यात प्रभावी नियंत्रण व वेळेवर सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राजुरा पथकाचे विभाजन करून कोरपना येथे राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रणाचे स्वतंत्र पथक निर्माण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
. कोरपना तालुक्यातील अनेक भाग आदिवासी व मागासवर्गीय असल्याने येथे हत्तीरोगासारख्या आजाराच्या नियंत्रणासाठी अधिक वेगळ्या प्रयत्नांची गरज आहे. विशेषतः सीमावर्ती भाग, डोंगराळ व जंगल भागांमध्ये नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्य व जिल्हा आरोग्य प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कोरपना येथे स्वतंत्र राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथकाची स्थापना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


