Home चंद्रपुर जिल्हा विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांवर २९ लाखाचा दंड

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर २९ लाखाचा दंड

970

महसूल विभागाची कारवाई

शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अवैध उत्खनन प्रकरण

राजुरा : पहाडावरील शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रालगतचा पहाड पोखरून शेकडो ब्रास मुरुमाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली होती. कोणताही परवाना व आदेश नसताना संबंधित आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी कारनामा केल्याचे समोर आले होते. पंचनाम्यात ४२२ ब्रास मुरूमाचा अवैध साठा आढळून आला.आता या अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ चे पोट कलम ७ व ८ (१)(२) नुसार महसूल विभागाने सुखदेव करेवाड या वैद्यकीय अधिकाऱ्यावर २९ लाखाचा दंड ठोठावला आहे. मनमानी करून डोंगर पोखरणे वैद्यकीय अधिकाऱ्याला चांगलेच महागात गेले आहे.

.          जानेवारी महिन्यात शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यानी विना परवानगीने परिसरातील डोंगर जेसीबीने पोखरून काढला होता. सतत महिनाभर १०-१२ ट्रॅक्टर मधून लाल मुरुमाची अवैध वाहतूक करण्यात आली होती. यातील शेकडो ब्रास मुरुम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात टाकण्यात आला होता व केंद्राच्या बाहेर देखील मुरुम टाकून लेव्हल करण्यात आले होते. सोबतच शेकडो ब्रास मुरूमची परस्पर इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली होती. डोंगर पोखरून मुरुमाची वाहतूक महिणाभर बिनदिक्कतपणे सुरू होती. मात्र महसूल विभागाला याची भनक लागली नाही. दरम्यान गावकऱ्यांच्या बोंबानंतर महसूल विभाग जागे झाले व चौकशीचे आदेश देण्यात आले.

.        महसूलच्या पंचनाम्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात २७२ ब्रास मुरुमाची अवैधरित्या साठवणूक करण्यात आल्याचे आढळून आले. तसेच १५० ब्रास लाल मुरूम दवाखान्याच्या बाहेर टाकण्यात आल्याचे दिसून आले. उत्खनन करून एकूण ४२२ ब्रास मुरुमाची उचल करण्यात आल्याचे समोर आले. मात्र मुळात ३० फूट उंच पहाडातून हजारो ब्रास मुरूम काढल्याची चर्चा आहे. या मुरुमाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर महसूल विभागाने संबंधित आरोग्य केंद्रातील सुखदेव करेवाड वैद्यकीय अधिकाऱ्याला खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र त्यांच्या खुलासात परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विना परवाना डोंगर पोखरून मुरूमाचे उत्खनन केल्याचे उघड झाले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात २७२ ब्रास मुरुमाची अवैधरित्या साठवणूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. २८ लाख ८३ हजार २०० रुपयाचा दंड वैद्यकीय अधिकाऱ्यांवर ठोठावला आहे. या दंडाची रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांला पहाड खोदणे चांगलेच महागात पडले आहे.

महसूल विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील २७२ ब्रास मुरुमाची अवैधरित्या साठवणूक केल्याप्रकरणी दंडाची कारवाई करण्यात आली आहे.मात्र याच केंद्रा बाहेर १५० ब्रास मुरुम आढळून आला आहे व पंचनाम्यात नमूद आहे. तेव्हा महसूल विभागाने या 422 ब्रास मुरुमावर दंडाची आकारणी करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वसूल करावा.                                                                                                                                                              प्रविन मेकर्तीवार,                                                                          राजुरा

अखेर या पहाडात दडलंय काय❗                                                                                                                                                       शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला लागून असलेला पहाड हा सुरक्षा भिंत म्हणून उभा होता.या पहाडापासून कुणालाही त्रास नव्हता. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विना आदेश व परवाना शिवाय अंदाजे ३० फूट उंच पहाड खोदून काढला व मुरुमाची परस्पर विल्हेवाट लावली.एवढा भला मोठा पहाड खोदण्या मागचे कारण गुलदस्त्यात आहे.अखेर या पहाडात दडलंय काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

error: Content is protected !!