गावकऱ्यात प्रचंड दहशत
वनविभाग गप्प
सिंदेवाही : शिवणी वनपरिक्षेत्रातील मौजा वासेरा येथे मागील १० ते १२ दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून केवळ एकच बिबट्या नसून बिबट्याची जोडी गावामध्ये फिरत असल्याचे अनेकांनी प्रत्यक्ष बघितले असून त्यामुळे आता नागरिकांमध्ये बिबट्याच्या जोडीची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मात्र वनविभागाची कार्यवाही शून्य असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या वासेरा हे अंदाजे साडे चार हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गावातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असला, तरी शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बकऱ्या, कोंबड्या पाळलेल्या आहेत. या कोंबड्या बकऱ्यांवर ताव मारण्यासाठी मागील दहा ते बारा दिवसापासून गावात बिबट्याची दहशत सुरू असून आतापर्यंत बिबट्याने अनेकांच्या कोंबड्या, बकऱ्यावर ताव मारून फस्त केलेल्या आहेत. याबाबत वनविभागाला माहिती देऊन सुद्धा वनविभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने आता गावात बिबट्याची जोडी फिरत असल्याचे अनेकांनी प्रत्यक्ष बघितले आहे. सतत दोन दिवस खुले नाट्यगृह पासून तर ग्राम पंचायत कार्यालयाचे मागे बिबट्याने चांगलाच हौदोस घातला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोबाईल टॉवर चे बाजूने वाढई यांचे घराकडे बिबट्याला अनेकांनी प्रत्यक्ष बघितले आहे. याबाबतची सर्व माहिती वनविभागाला मिळूनही संबंधित विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बरेच नागरिक बाहेर बसून थंड हवेचा आस्वाद घेत असतात. मात्र गावात बिबट्याची जोडी फिरत असल्याने गावात लवकरच कर्फ्यु लागल्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. वनविभागाने या गंभीर प्रकाराकडे त्वरित लक्ष घालून बिबट्याच्या जोडीचा कायमचा बंदोबस्त करावा. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


