अटक करून कडक कारवाई करा
पत्रकारांचे उपविभागीय पोलिस अधिकार्यांना निवेदन
ब्रम्हपुरी : वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारास जनावरांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या तस्कराकडून अर्वाच भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार रविवारी रात्री ब्रम्हपुरी येथे घडला. धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी यासाठी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून जनावर तस्करी करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूनी घटनेचा निषेध करीत उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
. सविस्तर वृत्त की, दिनांक १९ मार्च ला रात्री ८.३० वाजत नेवजाबाई हितकारिणी कॉलेज गेट जवळ अवैधरीत्या जनावरांची तस्करी करणारे दोन ट्रक हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्त्यांनी अवैध जनावर वाहतुकीचा ट्रक अडवला व तातडीने प्रशासनास माहिती दिली. सदर घटनेची माहिती मिळताच शहरातील काही पत्रकार वृत्त संकलनासाठी घटना स्थळी गेले. त्यात पत्रकार राहुल श्रीराम भोयर यांनी घटनास्थळी पोहोचून पत्रकारितेच्या कर्तव्यासाठी व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले.
. मात्र त्यावेळी नागभीड येथील एका अनोळखी तस्कराने ‘बे कायको व्हिडिओ बना रहा बे, बंद कर… तुम जैसे पत्रकार बहुत देखे’ अशा अपमानास्पद, अश्लील व धमकीवजा भाषेत बोलत, त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटला. काही वेळ मोबाईल ताब्यात ठेवत, पत्रकाराच्या कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर सरळ हल्ला असून पत्रकार संरक्षण कायदा २०२३ आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हा आहे. या घटनेची माहिती घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस ठाणेदारांना देण्यात आली. त्यांनी ‘एफआयआर नोंदवतो’ असे आश्वासन दिले; परंतु घटनास्थळीच किंवा लगेच कोणतीही कारवाई केली गेली नाही,
. सदर घटनेनंतर ब्रह्मपुरीतील पत्रकारांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले व पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली. दुर्दैवाची बाब म्हणजे, पत्रकारांनी चर्चा करण्यासाठी पोलीस निरीक्षक यांना बोलावले असता त्यांनी चर्चा करण्यासाठी माझी मानसिकता नाही असे सांगून चर्चा टाळली; मात्र त्याच वेळी एका राजकीय नेत्यासोबत केबिनमध्ये बंद दाराआड चर्चेत ते स्वस्थ दिसले. हा दुजाभाव आणि पत्रकारांना डावलण्याची वृत्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
. ब्रह्मपुरीतील पत्रकारांच्या एकतेमुळे हा प्रकार बाहेर आला असून, पत्रकारांसोबतच समाजातील जागृत घटकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या गोतस्करीला थारा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करावी, तसेच ज्या जनावर तस्करांनी पत्रकाराला धमकी दिली त्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा पत्रकार संघटनांच्या वतीने मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.


